आपल्याच मुलाला काठीने केली मारहाण,त्याचं रडणं थांबलं ते कायमचंच.
उत्तर प्रदेशातल्या हरदोईमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी घर आनंदाने भरून जाण्याऐवजी त्या घरात दुःखाचा काळोख भरून राहिला आहे. या.
एका व्यक्तीला आपल्या सात वर्षांच्या मुलाचं सततचं रडणं सहन झालं नाही. त्यामुळे त्याचा क्रोध अनावर झाला आणि त्याने आपल्याच मुलाला काठीने मारहाण केली. त्यामुळे तो मुलगा घायाळ झाला. त्याचं रडणं थांबलं ते कायमचंच. कुटुंबीय त्या मुलाला तातडीने दवाखान्यात घेऊन गेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
उत्तर प्रदेशातल्या हरदोईमधल्या बघौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या पहाडपूर नावाच्या गावात ही दुर्दैवी घटना ऐन दिवाळीत घडली. तिथे राहणाऱ्या जोगेंद्रपालसिंह यांचे पुत्र असलेल्या विश्रामसिंह पासी यांच्या हातून हे कृत्य घडलं आहे. विश्रामसिंह यांनी आपला सात वर्षांचा मुलगा अनुराग याला काठीने मारहाण केली. त्यात अनुराग गंभीर जखमी झाला. तो गंभीर जखमी झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने हालचाली करून त्याला स्थानिक सीएचसीमध्ये उपचारांसाठी नेलं; मात्र त्या धावपळीचा काही उपयोग झाला नाही. तिथे नेण्याआधीच अनुरागने या जगाचा निरोप घेतला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या घटनेमागचं कारणही खूप क्षुल्लक आहे. सात वर्षांचा मुलगा रात्री रडत होता. कारण त्याला त्याच्या आजीला भेटायचं होतं. त्यासाठी तो हट्ट करत होता. त्यावर त्याच्या वडिलांना राग आला. त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी त्याला काठीने मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत मुलाचं शरीर ताब्यात घेतलं आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलं. आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी सांगितलं, की आरोपी आता तुरुंगात असून, त्याची चौकशी केली जात आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच केवळ त्याच कुटुंबात नव्हे, तर गावावर शोककळा पसरली. पित्याच्या हातून घडलेल्या या कृत्याची सर्व जण निंदा करत आहेत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग काही कारणावरून रडत होता. त्यामुळे रागावून त्याच्या वडिलांनी त्याला मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अनुरागचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमला पाठवला आहे. आरोपी वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. अपर पोलीस अधीक्षक दुर्गेशकुमार सिंह यांनी सांगितलं, की मुलाचं रडणं सुरू होतं, म्हणून वडिलांनी त्याला काठीने मारलं. त्यातच सात वर्षांच्या अनुरागचा मृत्यू झाला.