जरांगेंचा काठी आणि घोंगडं देऊन सत्कार,उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं’ मनोज जरांगेंचा इशारा
अहमदनगरच्या चौंडीत दसऱ्यानिमित्तानं धनगर समाजानं एसटी आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी मेळावा आयोजिक केला. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हजेरी लावत धनगरांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.
जरांगेंचं काठी आणि घोंगडं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत सेनेच्यावतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे, आमदार राम शिंदे आणि माजी आमदार अण्णासाहेब डांगे उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजा (Maratha) संपूर्ण ताकदीने धनगर समाजाच्या पाठिशी उभं असल्याचं सांगितलं. धनगर समाजाला घटनेत आरक्षण आहे, मग तुम्हाला आरक्षण मिळालं कसं नाही हे कळायला मार्ग असल्याचं सांगत मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला.
सर्वसामान्य धनगर बांधवांनी मनात आणलं तर आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच, इथं बसलेले सर्व धनगर प्रत्येक घरात गेले तर लाखो धनगर उभे राहतील आणि आरक्षण मिळेल असं जरांगे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी आम्हाला 40 दिवस दिले आणि धनगर समाजाला 50 दिवस दिले, यात काहीतरी गोंधळ आहे, पण मी छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. आज आम्ही दिलेल्या डेडलाईनचा शेवटचा दिवस आहे,संध्यााकाळपर्यंत आशा आहे, पण आज दिवसभरात काहीच झालं नाही तर उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय.
आरक्षण द्यायचं नसेल तर गावात येऊ नका, पुढच्या 50 दिवसात सरकराचं डोकं ठिकाणावर येईल, असंही मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे. आरक्षणावरुन आता धनगर समाजही आक्रमक झालाय.. धनगर समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात म्हणजे एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आलीय. आरक्षणासाठी धनगर समाजाने याआधी आमरण उपोषणही केलं होतं. चौंडी हे अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान आहे.
आज डेडलाईन संपणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन आज संपतेय. मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्याने घ्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला पक्के आहेत.. ते मराठा आरक्षण देतीलच असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय..नाहीतर 25 तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.