जालन्यात आंदोलकांवर लाठीचार्ज,बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला.
सायंकाळी बस जाळण्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालन्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले, तर इकडे बीडमध्येही याचे पडसाद उमटले. मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या मान्य करण्याची मागणी केली. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. शनिवारी सकाळपासूनच बीड बंद करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. याला राज्यभरातून पाठिंबा दिला जात आहे. या उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी दुपारीही मोठ्या फौजफाट्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली; परंतु नकार मिळाला. याचवेळी आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, तसेच आंदोलकांनीही दगडफेक केली. यात पोलिसांसह आंदोलक, सामान्य नागरिक जखमी झाले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद बीड जिल्ह्यातही उमटले आहेत. शुक्रवारी दिवसभर गेवराई शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शनिवारी बीड बंदची हाकही देण्यात आली होती. त्याप्रमाणे सकाळपासूनच समाज रस्त्यावर उतरला. सरकार विरोधात रोष व्यक्त करत आरक्षण देण्याची मागणी केली. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.