ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांदा खरेदीबाबतच्या फलकामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला


नाशिक:एकीकडे नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू असताना पिंपळगाव बसवंत बाजार समितीबाहेर लावण्यात आलेल्या कांदा खरेदीबाबतच्या फलकामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
यात कांदा खरेदीबाबत अनेक अटी शेतकऱ्यांवर लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदाप्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेडमार्फत बाजार समितीवर तत्काळ कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश जरी काढले असले तरी मात्र अद्याप ही खरेदी सुरू झालेली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मालाला भाव कमी मिळतो आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच बाजार समितीबाहेर कांदा खरेदीबाबत लावण्यात आलेला फलक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापात अधिकच भर घालणारा ठरला आहे. बाजार समित्यांबाहेर नाफेडच्या खरेदीबाबतचे होर्डिंग लावण्यात आले असून, त्यावर जाचक नियम व अटी देण्यात आल्या आहे. यात प्रतिहेक्टर २८० क्विंटलपेक्षा जास्त कांदा स्वीकारला जाणार नाही. दर्जेदार ४५ मिमीच्या पुढचा चांगला कांदा चालेल, असे सूचित करण्यात आले आहे. विळा लागलेला, पत्ती लागलेला, काजळी असलेला, रंग गेलेला, उन्हामुळे चट्टे पडलेला, आकार बिघडलेला, कोंब फुटलेला, गरम मऊ असलेला, बुरशीजन्य वास येत असलेला, मुक्त बेले असलेला कांदा स्वीकारला जाणार नसल्याचे या फलकावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

अटी जुन्याच : कृषिमंत्री मुंडे

दरम्यान, या जुन्याच अटी असून, यात नव्याने अटी घालण्यात आल्या नसल्याचे स्पष्टीकरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. ज्या अटी पूर्वी होत्या त्याच आजही आहेत. त्यात कुठल्याही नवीन अटींचा समावेश करण्यात आलेला नाही. ज्यावेळी कांद्याचे भाव पडले, त्यावेळी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात आली. त्यावेळीदेखील अशा अटी लावण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर आताही खरेदी करण्यात येत आहे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button