२०२४ ची तयारी सुरू; अमेठीतून स्मृती इराणी, अक्षय कुमार दिल्लीतून लढण्याची शक्यता
नवी दिल्ली: अमेठीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पुन्हा निवडणूक लढविण्याचे आव्हान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी वायनाडला का गेले, असे अमेठीची जनता आता त्यांना विचारणार आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.२०२४च्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे. राहुल गांधी अमेठीमधूनच लढणार, अशी घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी केल्यानंतर राजकारण तापले आहे.
स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या अमेठीमधून निवडणूक लढविण्याच्या वृत्तावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला आता अमेठीत काही करावे लागणार नाही. अमेठीची जनताच राहुल गांधी यांना विचारणार आहे की, अखेर त्यांना केरळच्या वायनाड मतदारसंघात का जावे लागले?
इराणी यांनी गांधी कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ अमेठीमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना ५५,१२० मतांनी पराभूत केले होते. तेव्हा अमेठीबरोबरच राहुल यांनी सुरक्षित मतदारसंघ वायनाडमधूनही निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. अमेठी मतदारसंघ गांधी कुटुंबीय सहजासहजी सोडणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.
अक्षयकुमार दिल्लीच्या चांदनी चौकातून लढण्याची चर्चा
अलीकडेच कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारताचे नागरिकत्व घेणारे चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांना भाजपच्या तिकिटावर दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाऊ शकते.
भाजपचे ज्येष्ठ नेते अक्षयकुमारच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक कामांची अक्षयकुमारने सार्वजनिकरीत्या अनेकदा स्तुती केलेली आहे.
अक्षयकुमार एकेकाळी दिल्लीच्या चांदनी चौकातील प्रसिद्ध ‘पराठेवाली गली’मध्ये राहत होता.
चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या डॉ. हर्षवर्धन करीत आहेत. त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे.