ताज्या बातम्या

कधी कधी पराभव चांगला असतो, कारण…”, पराभवानंतर हार्दिकने सांगितले धाडसी निर्णय


फ्लोरिडा (अमेरिका) | IND vs WI 5th T20 : वेस्ट इंडिजविरूद्धची मालिका गमावल्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. क्रिकेट हा खेळ असून यामध्ये हार जीत होत असते, असे पांड्याने सांगितले.

तसेच कधी कधी हरणे चांगले असते, कारण पराभवातून आपल्याला खूप काही शिकता येते असेही त्याने नमूद केले. वेस्ट इंडिजच्या ब्रँड किंगने त्याच्या नावाप्रमाणेच पाचव्या सामन्यात ‘राज’ केलं. ८५ धावांची नाबाद खेळी करून किंगने भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमानांनी आघाडी घेतली होती. पण, सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिका जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या. मात्र, तिसऱ्या आणि फायनल सामन्यात हार्दिकसेनेला पराभवाचा सामना करावा लागला अन् विडिंजने ३-२ ने मालिका खिशात घातली.

सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्याने टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तसेच काही धाडसी निर्णयांबद्दल देखील हार्दिकने सांगितले. “आम्हाला चांगल्या पद्धतीने सामना संपवता आला नाही. पण, यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. पराभव कधी कधी चांगला देखील असतो कारण तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. हार जीत हा खेळाचा भाग आहे असं मी समजतो. गोलंदाजीत बदल केले यासाठी मी कोणतीही रणनीती आखली नव्हती. आम्ही एक संघ म्हणून जे कठीण आहे ते करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे प्रथम फलंदाजी केल्याबद्दल मला पश्चात्ताप होत नाही. अशा खेळांमुळे आम्हाला चांगले होण्यासाठी शिकायला मिळेल”, असे हार्दिकने स्पष्ट केले.

वेस्ट इंडिजने ३-२ ने मालिका जिंकली
वेस्ट इंडिजच्या ब्रँडन किंगने ५५ चेंडूत नाबाद ८५ धावा करून सामना एकतर्फी केला. भारताने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजला कायल मेयर्सच्या रूपात पहिला झटका बसला. पण, किंग आणि निकोलस पूरन यांनी अप्रतिम खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कॅरेबियन संघाने १८ षटकांत २ गडी गमावून १७८ धावा करून विजय साकारला. भारताकडून तिलक वर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये निकोलस पूरनच्या रूपात आपला पहिला बळी पटकावला. अर्शदीप सिंगने सुरूवातीला एक बळी घेऊन विडिंजला मोठा झटका दिला पण त्यानंतर कोणत्याच भारतीय गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही.

  1. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यकुमार यादव (६१) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जैस्वाल (५), शुबमन गिल (९), तिलक वर्मा (२७), संजू सॅमसन (१३), हार्दिक पांड्या (१४) आणि अर्शदीप सिंगने (८) धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर अकील हौसेन (२) आणि जेसन होल्डर (२) आणि रॉस्टन चेस यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button