पोलिस भरती क्लासमध्ये दोन मुलींचे लैंगिक शोषण; पोलिसच करायचा…
नालासोपारा : पोलिसांकडूनच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. लैंगिक शोषण करणारा पोलिस हा नालासोपारा येथे पोलिस प्रशिक्षण क्लास चालवत होता.
दोन पीडित मुलींनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार क्लास चालवणारा पोलिस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात विनयभंग, तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली.
आरोपी समाधान गावडे (२८) आणि त्याची २५ वर्षीय मैत्रीण वसई रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. गावडे हा नालासोपारा येथे विजयी भव नावाची पोलिस अकादमी चालवतो. त्याच्यावर क्लासेसला येणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
आरोपी गावडे हा मुलींना अश्लील मेसेजेस पाठवत होता. तसेच व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करत होता. शिकविण्याच्या नावाखाली गावडे हा मुलींच्या अंगाला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करीत असे. अनेकदा मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा. तर काही वेळा त्यांना फिरायला बोलवत होता. त्याच्या मैत्रिणीने या कृत्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. तिने एका पीडित मुलीचे व्हॉट्सॲप स्कॅन करून आरोपी गावडेबरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. या प्रकारामुळे पीडित मुलींनी क्लासमध्ये जाणे बंद केेले. बुधवारी नालासोपारा पोलिस ठाण्यात आरोपी पोलिस समाधान गावडे आणि त्याची मैत्रीण या दोघांविरोधात विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलींच्या जबाबानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
– विलास सुपे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नालासोपारा पोलिस ठाणे