महात्मा फुले देशद्रोही! साईबाबांना देव्हाऱ्यातून काढा – भिडे गुरुजी
संभाजी भिडे यांची आक्षेपार्ह वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. आता त्यांनी उत्तर प्रदेशातील भारतप्रसाद मिश्रा, बंगालमधील राजा राममोहन रॉय आणि महाराष्ट्रातील महात्मा जोतिबा फुले या समाजसुधारकांना देशद्रोही म्हटले आहे.
शिर्डीच्या साईबाबा यांना देव्हाऱ्यातून काढा असे विधानही त्यांनी केले. या विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या कथित ऑडिओत त्यांनी अपशब्दही वापरले आहेत. दरम्यान, महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या विधानावरून वादळ उठले असताना भिडेंच्या व्याख्यानाची नवी क्लिप समोर आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकांना सुपर समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले गेले. त्यात उत्तर प्रदेशमध्ये भारतप्रसाद मिश्रा, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, तामीळनाडूमध्ये रामास्वामी नायर आणि महाराष्ट्रात महात्मा फुले यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यावर देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत, असे भिडे म्हणाले. भिडे यांचे तीन तासांचे हे भाषण आहे. आपला हिंदू समाज साईबाबांना पूजतो, पण ते काय आहेत ते आधी तपासा आणि सगळय़ात आधी साईबाबांना देव्हाऱ्यातून काढा, असे वादग्रस्त विधानही भिडे गुरुजींनी केले. दरम्यान, भिडे यांना आज वाशीम येथील व्याख्यानाच्या वेळी काळे झेंडे दाखवण्यात आले.
पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना फोन आणि ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. ‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता, तुम्हाला जगायचे आहे ना,’ असे चव्हाण यांना धमकावण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या कराड येथील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही – फडणवीस
कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधी यांचा अवमान सहन करणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात त्यांच्याकडे महानायक म्हणून पाहिले जाते. अशा महानायकाबद्दल असे उद्गार काढणे अनुचित आहे. महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर कुणाहीविरोधात बोललेले सहन केले जाणार नाही. भिडेंचा भाजपशी काहीही संबंध नाही ते स्वतःची संघटना चालवतात. याला राजकीय रंग देण्याचे कारण नाही, असेही ते पुढे म्हणाले.
भाजप खासदाराकडून समर्थन
संभाजी भिडेंवर सगळीकडे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी करतानाच संभाजी भिडे हे अफजल खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचे वंशज आहेत. त्यांचे खरे नाव मनोहर कुलकर्णी आहे असे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या. तर भाजपचे खासदार अनिल बोंडे भिडे गुरुजींच्या समर्थनात पुढे आले. भिडे गुरुजींना शिव्या देऊन यशोमती ठाकूर यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बोंडे यांनी केली. ते तक्रार घेऊन पोलीस ठाण्यातही गेले.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार
महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी भिडे यांच्याविरुद्ध अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेऊन अटकपूर्व जामिनासाठी शिवप्रतिष्ठान संघटनेच्या वतीने अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे.