पाकिस्तानमध्ये जाहीर सभेत बॉम्बस्फोट, प्रमुख नेत्यासह 40 ठार
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील खार तालुक्यात आयोजित जमियत उलेमा इस्लाम-फझल या कट्टरपंथीय राजकीय पक्षाच्या मेळाव्यात रविवारी दुपारी आत्मघाती बॉम्बरने घडवलेल्या बॉम्बस्फोटात या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यासह 40 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 150 हून अधिक लोक जखमी झाले.
बाजौर जिह्याचे आपत्कालीन अधिकारी साद खान यांनी सांगितले की, या स्पह्टात जेयूआय-एफचे प्रमुख नेते मौलाना झियाउल्लाह जान यांचाही मृत्यू झाला. जखमींना पेशावर आणि टीमरगेरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेक जखमी अत्यवस्थ आहेत. या मेळाव्यासाठी सुमारे 500 लोक उपस्थित होते. प्राथमिक तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याचे समोर आले आहे, मात्र स्पह्ट नक्की कशाचा झाला हे निश्चित करण्यासाठी पुरावे गोळा करण्यात येत आहेत, असे पोलीस महानिरीक्षक नसीर मेहमूद सट्टी यांनी सांगितले.
पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि प्रांताचे काळजीवाहू मुख्यमंत्री आझम खान यांनी याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी पक्षाचे प्रमुख मौलाना फजलूर रेहमान यांनी केली आहे. अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यापासून ऑगस्ट 2021 पासून पाकिस्तानच्या सीमाभागातील बॉम्बस्पह्ट आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे.