संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ!
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळामुळे कामकाज होऊ शकले नाही. विरोधी पक्षांनी यावेळी मणिपूर प्रकरणावर गदारोळ घातला, तर चर्चेस तयार असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गदारोळात वाया गेला. लोकसभा आणि राज्यसभेत कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर नवीन खासदारांना शपथ देण्यात आली. दिवंगत खासदारांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजता पुन्हा सुरू झाले, तेव्हा विरोधकांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चेची मागणी करत गदारोळ सुरू केला. यानंतर राज्यसभेचे सभापती उपसभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. दुपारी दोन वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज आज सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांवर टिका केली. ते म्हणाले, सभागृहाचे कामकाज आणि कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांची वृत्ती पाहून हे स्पष्ट होते की, ते सभागृहाचे कामकाज चालू देणार नाहीत. मणिपूरच्या घटनांबाबत आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे सरकारने स्पष्ट केले असतानाही काँग्रेसने कामकाज होऊ दिले नाही. त्यामुळे काँग्रेसला केवळ गदारोळात रस असल्याची टिका गोयल यांनी यावेळी केली आहे.