मोकळी राने… कोरडी मने… उदास शेतकरी!
सातारा:तब्बल दीड महिना संपला तरी अद्यापही पावसाने दडी मारली असून, जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाची चांगली नक्षत्रे संपूनही पाऊस न पडल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे.
पावसाळ्याचा दीड महिना संपूनही पाऊस न पडल्याने सध्या नद्या रोडावल्या असून, ओढे-नाले आटले आहेत. खरीप पेरण्यांसाठी शेतकरी बी बियाणे बांधून तयार आहे; पण पावसाअभावी हे बियाणे वाया जाते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. पावसाळ्याचा दीड महिना संपल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, खरीप पेरण्या होतील का याबाबत साशंकता आहे. अर्थात ज्यांच्याकडे सिंचन सुविधा आहे, त्यांनी थोड्या फार पेरण्या केल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणावर पेरण्या झालेल्या नाहीत. जेथे थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला तेथे पेरण्या झालेल्या असल्या तरी त्या कितपत तगतील, हा खरा प्रश्न आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी कमी झाली असून यावर्षी धरणे भरली नाहीत तर उसाच्या लागणीही फारशा होणार नाहीत. त्याचा आगामी काळातील साखर कारखानदारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडूनच आता खरीप हंगामाबाबत शेतकर्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.