शिंदे सरकारमधील भाजपच्या 4 मंत्र्यांना वगळणार?
मुंबई:महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथी सुरू राहणार असल्याचे चित्र आहे. राज्यातल्या शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रातल्या पुढल्या निवडणुकांचा विचार करून भाजप आपल्या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.चांगली कामगिरी नाही हे कारण देत भाजप त्यांच्या 4 मंत्र्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे. भाजप वगळणार असलेल्या मंत्र्यांमध्ये मुंबईचा 1, उत्तर महाराष्ट्रातील 1 आणि पश्चिम महाराष्ट्रातील 2 असे 4 जण असल्याची चर्चा आहे. या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना भाजपकडून संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
शिंदे सरकारमध्ये अलिकडचे सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यापैकी एकाही मंत्र्याला खातेवाटप झालेले नाही. मंत्रिमंडळ विस्तार होईल त्याचवेळी खातेवाटप होईल असे समजते. यामुळे खातेवाटप जाहीर होण्यासाठी आणखी काही काळ जाईल, असे चित्र आहे. महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सोमवार 17 जुलै 2023 पासून सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या आधी तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा घोळ सोडवला जाणार की नाही, यावरून चर्चेला उधाण आले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सहकारी आमदारांना मोठा दबाव असल्याचे वृत्त आहे. इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होण्यास वेळ लागत असल्याचे समजते. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या संदर्भातला अंतिम निर्णय दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाणार असल्याचे समजते.
महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन
महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार 17 जुलै 2023 ते शुक्रवार 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत पार पडणार आहे. हे अधिवेशन मुंबईत होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार, विधानपरिषदेचे सभापती बदलणार;
मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहणार असल्याचे वृत्त आहे. विधान परिषदेचे सभापती पावसाळी अधिवेशनादरम्यान बदलले जाण्याची दाट शक्यता आहे.