ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहर पोलिस दलातील २४० कर्मचाऱ्यांच्या बदल्या


नाशिक:नाशिक ग्रामीण पोलिस दलानंतर आता शहर पोलिस दलातील शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अंमलदारांच्या बदल्या नुकत्याच जाहीर झाल्या.
आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलिस आयुक्तालयातील २४० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, विनंती अर्ज करून बदली मागणाऱ्या अंमलदारांच्या बदलीचा विचार होण्याची शक्यता नसल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

शहर आयुक्तालयातील पोलिस ठाणे व इतर विभागांत ठरलेल्या मुदतीत सेवा बजावलेल्या अंमलदारांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. कालावधी पूर्ण केलेल्या अंमलदारांच्या अर्जातील पसंतीक्रमानुसार बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखा व त्यांची पथके, पोलिस ठाणे, मुख्यालय, महिला सुरक्षा विभाग, वाहतूक विभाग, विशेष शाखा, अतिक्रमण निर्मूलन विभाग, बॉम्ब शोधक व नाशक पथक, जलद प्रतिसाद पथक, मोटार परिवहन विभागातील अंमलदारांचा समावेश आहे. तसेच सेवानिवृत्तीमुळे मुख्यालय, विशेष शाखा, गुन्हे शाखा व नियंत्रण कक्षातील दोन सहायक उपनिरीक्षक, दोन श्रेणी उपनिरीक्षक, सहा हवालदारांसह एक पोलिस नाईक यांना एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, बऱ्याच अंमलदारांनी विनंती अर्ज करून त्यांच्या सोयीनुसार बदली मागितली. मात्र, आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार या अर्जांचा तूर्तास विचार होणार नसल्याचे आयुक्तालयाने सांगितले.

बदली झालेले मनुष्यबळ

पोलिस शिपाई : १३३, पोलिस नाईक : ४८, हवालदार : ४०, सहायक उपनिरीक्षक : १५, श्रेणी उपनिरीक्षक : ०४

वाहतूक शाखेला मोजकेच बळ

शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्यासोबतच अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेवर भिस्त आहे. मात्र सद्यस्थितीत वाहतूक शाखेत 300 अंमलदारांचा फौजफाटा असून, यंदाच्या बदल्यांमध्येही मोजकेच अंमलदार वाहतूक शाखेत आले आहेत. शहर वाहतूक शाखेतील 10 अंमलदारांच्या इतरत्र बदल्या झाल्या असून, वाहतूकमध्ये नव्याने सहा जण नियुक्त केले आहेत.

सहायक निरीक्षकांच्याही बदल्या

राज्य पोलिस दलाने राज्यातील ९९ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये नाशिकमधील १० सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. नाशिक परिक्षेत्रातील अनंत कांबळे यांची मुंबई शहरात बदली करण्यात आली, तर मुंबई शहराचे भास्कर शिंदे, भरत चौधरी, संगीता गिरी, ठाणे शहरातील हरिदास बोचरे, जगदाशी मुलगीर, नागपूर शहरातील पूनम श्रीवास्तव, नीलेश वतपाळ, भंडाऱ्यातील दीपक पाटील यांची नाशिक परिक्षेत्रात बदली झाली आहे. तसेच शहरातील गणेश शिंदे व महेश येसेकर यांचीदेखील नाशिक परिक्षेत्रात बदली झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button