अहमदनगरमध्ये आज संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा, तर मुक्ताबाईंची पालखी बीड शहराकडे मार्गस्थ
विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊली तू विठ्ठलाची’, माझे, माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी’, अशा असंख्य अभंगांनी पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहेअशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी नगर जिल्ह्यात असून काल अहमदनगर शहरात दाखल झाली. त्यानंतर आज अहमदनगर शहरात संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तर काल गेवराई शहरातील येथील मुक्कामानंतर मुक्ताबाईंची पालखीचं आज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडत पाडळसिंगी येथे मुक्कामी असणार आहे.
गेल्या बारा दिवसांपसून पंढरपुरला विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा तेरावा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यात असून काल नगर शहरात मुक्काम केला. त्यानंतर आज देखील संपूर्ण दिवस शहरात समाधी सोहळा संपन्न होणार आहे. संत निवृत्तीनाथांची पालखी आज दिवसभर समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अहमदनगर शहरात असणार आहे.
राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यातील गेवराई या तालुक्याच्या ठिकाणी मुक्कामी होती.आज पालखीचा तेरावा दिवस असून मुक्कामाच्या ठिकाणाहून पालखीने प्रस्थान करत पुढे मार्गस्थ झाली आहे. तर दुपारी गढी येथे दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी याच मार्गाने पुढे बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी भागात विसावा घेणार आहे.
आज पालख्यांचा मुक्काम कुठे?
संत निवृत्तीनाथांची पालखी आज अहमदनगर शहरात विसावणार आहे. याच ठिकाणी संत निवृत्तीनाथ समाधी सोहळा पार पडणार आहे. सकाळी दहा ते बारा यावेळेस हा समाधी सोहळा पार पडणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज गेवराई शहरातून मार्गस्थ होऊन पायी मार्गक्रमण करणार आहे. या दरम्यान दुपारी गढी येथील ग्रामस्थांकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यांनतर दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे असणार आहे.