शेतकरी आत्महत्या; सर्व्हेद्वारे शोधणार क्लस्टर, विभागीय आयुक्तांची माहिती
अमरावती : शेतकरी आत्महत्या होऊच नये, यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यात गावपातळीवर सर्व्हे करण्यात येणार आहे.
याद्वारे क्लस्टर शोधून तेथे फोकस करण्यात येऊन शासन योजनांच्या अंमलबजावणीसह अन्य उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ निधी पाण्डेय यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
पश्चिम विदर्भात पाच महिन्यात ४२४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात प्रमाण वाढतेच आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या अर्थिक, सामाजिक व कौंटुबिक सुरक्षिततेबाबतची पाहणी करण्यात येणार आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक यांच्याद्वारे ही माहिती गोळा करतील. संकलित माहितीच्या आधारे क्लस्टर शोधण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
या अनुषंगाने यंत्रणांची बैठक घेऊन नुकतेच निर्देश देण्यात आलेले आहे. गावपातळीवरुन प्राथमिक माहिती संकलित करण्यात येत आहे. यापूर्वी अौरंगाबाद येथे जिल्हाधिकारी असतांना अशा प्रकारच्या उपाययोजना प्रभावी ठरल्या होत्या. त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात आता हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.