वैद्यकीय चमत्कार! गर्भात असलेल्या बाळावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
ज्ञान आणि तंत्रज्ञानाने माणसाच्या प्रगतीत एक निर्णायक भर घातली आहे. कारण, वैद्यकीय क्षेत्रात उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती. आता या वैद्यकीय प्रगतीचा आलेख आणखी उंचावला आहे.
अमेरिकेत डॉक्टरांच्या पथकाने चक्क आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचा चमत्कार केला आहे. हे बाळ अद्याप गर्भातच आहे, तरीही त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने वैद्यकीय इतिहासात एक ऐतिहासिक पर्वाची नोंद झाली आहे.
अमेरिकेत बोस्टनमधील लुईझियाना येथे राहणारी केन्याट्टा गर्भवती आहे. तिच्या तपासणीवेळी तिच्या पोटातील बाळाच्याही तपासण्या करण्यात आल्या. तेव्हा तिच्या गर्भातील बाळाला लेन मॅफॉर्मेशन नावाचा धमन्यांना एक दुर्मीळ आजार झाल्याचं उघड झालं. हा मेंदूतील रक्तवाहिन्यांसंबंधित एक घातक आजार आहे. या आजारावर उपचार न होता बाळ जन्माला आलं असतं तर ते जगण्याची शक्यता कमी होती. केन्याट्टाने या शस्त्रक्रियेविषयी चर्चा करून डॉक्टरांना तशी परवानगी दिली.
डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया करून बाळाला जन्माआधीच मृत्युपासून वाचवलं. जगातील ही पहिली आणि चमत्कारिक शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया झाली नसती तर जन्माला येताच बाळाचं हृदय बंद पडलं असतं किंवा त्याला तीव्र पक्षाघात झाला असता. पण, शस्त्रक्रियेनंतर हे बाळ आणि आई सुरक्षित आहेत. ही शस्त्रक्रिया झाली तेव्हा केन्याट्टा 34 आठवड्यांची गर्भवती होती. शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसांनी मुलाचा जन्म झाला. तिचं बाळ सुदृढ असून त्याची वाढही उत्तम असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.