नदीकाठी सापडले मानवी मृतदेहाचे 3 तुकडे, शेजारी पडले होते महिलेचे कपडे, पोलीस काय म्हणाले?
उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यात बौर नदीच्या काठावर एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना केलाखेडा पोलीस ठाणे परिसरातील आहे. स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच काशीपूरचे एसपी अभय सिंह पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि महिलेच्या शरारीचे तुकडे ताब्यात घेतले. पोलिसांनी आणखी अवयव शोधले, पण त्यांना काहीही सापडले नाही.
सापडलेल्या अवयवांजवळ पडलेल्या कपड्यांच्या आधारे ते दोन दिवसांपूर्वी रामपुरकाजी गावातून बेपत्ता झालेल्या जोगिंदर कौरचे असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एसपी अभय सिंह यांनी याबाबत सांगितले की, केलाखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बौर नदीच्या काठावर दोन पाय आणि दुसरा अवयव सापडल्याची माहिती मिळताच आमची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली आणि मानवी अवयव ताब्यात घेऊन डायव्हिंग टीमने धड व इतर अवयवांचा नदीत शोध घेतला, असे त्यांनी सांगितले. रामपुरकाजी गावात राहणारी जोगिंदर कौर तिच्या पाच भाऊ आणि आणखी एका सावत्र भावासोबत राहत होती.
जोगिंदर कौरच्या भावांनी बुधवारी बहीण बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी जोगिंदर कौरचा शोध सुरू केला आहे. बौर जलाशयापासून 100 मीटर अंतरावर दोन पाय आणि दुसरा अवयव पडून असल्याची माहिती गुरुवारी पोलिसांना मिळाली. अवयवांजवळ कापडाचे तुकडे पडले होते, जे जोगिंदर कौरचे असल्याचे सांगितले जात आहे.
हे अवयव तिचे आहेत की नाही, याचा तपास फॉरेन्सिक टीम करत आहे. लवकरच खुलासा होणार – एसपी अभय सिंह यांनी सांगितले की, डावव्हिंग टीम, श्वान पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून तपास सुरू केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 6 पोलिस पथके तयार करण्यात आली असून, ते सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच या घटनेतील आरोपी उघड करून त्यांना जेरबंद केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.