तपासासाठी हजार किमीचा प्रवास अन् ३ राज्यात धुमाकूळ घालणारी वाहन चोरांची टोळी जेरबंद
हिंगोली : कर्नाटक, तेलंगाना व महाराष्ट्रात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला व पाच जिल्ह्यातील पोलिसांना हवा असलेला चोरटा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर पथकाने आंतरराज्य वाहन टोळीचाच पर्दापाश केला. चारजण ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दहा लाखांचे दोन वाहने जप्त केली.
हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता भागातून ३ जून रोजी ट्रक चोरीला गेला होता. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ट्रक चोरट्याच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. यातील ट्रक चोरटा सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने खुर्शीद अहमद बशीर अहमद (वय ५० वर्षे,रा. चंद्रानगुट्टा पलकनुमा पॅलेस हैदराबाद) यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने ट्रक चोरल्याची कबुली दिली. तसेच हा ट्रक त्याचा मित्र आरेफ अहमद शेख (रा. आळंद ता. फुलंब्री) यास विकल्याचे सांगितले. पोलिसांनी आरेफ शेख यास ताब्यात घेतले असता त्याने हा ट्रक त्याचा मित्र रोमान उर्फ शेख शाहेद अख्तर शेख रफीक (रा.रेंगटीपुरा छत्रपती संभाजीनगर), अझर अकबर शेख (गारखेड परिसर छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्फत शे.शाहेद शे.वाहेद (रा. धाराशीव) याला विकल्याचे सांगितले. पथकाने ट्रक जप्त केला. तसेच यातील तिघांनी महागाव (जि. यवतमाळ) पोलिस ठाणे हद्दीतील गुंज येथून १ कार चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी यातील चार जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
जळगाव कारागृहातून सुटला अन् पुन्हा चोरी
यातील खुर्शीद अहमद बशीर अहमद हा वाहन चोरीचा आंतरराज्य गुन्हेगार असून तो काही दिवसांपूर्वीच जळगाव कारागृहातून सुटल्याची माहिती आहे. तसेच त्याच्यावर कर्नाटक, तेलंगाना व महाराष्ट्र या तिन्ही राज्यात एकूण २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील पोलिस त्याचा शोध घेत होती. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा पर्दापाश केला.
दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवास
हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवास करून दरोडा,चोरी,जबरी चोरी,वाहन चोरी सारख्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पकडले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, किशोर कातकडे, लिंबाजी व्हावळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, प्रमोद थोरात यांच्या पथकाने केली.