“फडणवीसांना कोरेगाव दंगली प्रकरणी साक्ष देण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवा”, आंबेडकरांच्या मागणीने खळबळ
पुणे : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आयोगानं समन्स पाठवून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयोगाला पत्रही पाठवलं आहे. आंबेडकरांनी पाठवलेल्या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी काही प्रश्नांची उत्तर मागिवली आहेत.
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी आयोगाला पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आपण याआधी देखील मला अनेक पत्र पाठवली आहेत.मी याआधी आपल्याकडे मागणी केली होती की माझी साक्ष घेण्याआधी आपण मला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक, माजी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावून त्यांची साक्ष तपासायची आहे, त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात यावी. असं पत्रात म्हटलं आहे.
तसेच प्रकाश आंबेडकरांनी याबाब काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री, माजी मुख्यसचिव आणि पोलीस अधिक्षक यांना सदर घटनेची माहिती कशी मिळाली? केवळ कोरेगाव भीमापासून ४० किलोमीटर दुर असलेल्या मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती उशीरा मिळाली का? जर घटनेची माहिती तात्काळ मिळाली असेल तर मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती नसल्याचं माध्यमांशी बोलताना कसं काय म्हटलं.? मुख्यमंत्र्यांना सदर घटनेपासून अंधारात तर ठेवण्यात आलं नव्हतं ना. ? असा सवालही केला आहे.