शेतीच्या विकासासाठी यांत्रिकीकरणाचा वापर आवश्यक
शेतीच्या विकासासाठी यांत्रिकीकरणाचा वापर प्रभावीपणे करणे आवश्यक असून शेतकऱ्यांमध्ये कौशल्य विकास करणे आवश्यक असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यालय, परभणी आणि सी. एन. एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ”कौशल्य विकास-कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण” कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ सोमवारी (ता. 5) स्थानिक पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून कुलगुरू डॉ. इंद्र मणी बोलत होते.
यावेळी ऑनलाइन माध्यमाद्वारे अटारी पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, सीएसआर, सीएनएच नवी दिल्लीच्या प्रमुख कविता साह, सीएसआर, सीएनएचचे पश्चिम प्रक्षेत्र प्रमुख नितीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, डॉ. उदय खोडके, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ.किशोर झाडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. इंद्र मणी म्हणाले, की यासाठीच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यालय, परभणी आणि सी.एन. एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड), नवी दिल्ली यांच्यात करार होऊन ”उन्नत कौशल्य-कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण” कार्यक्रम मराठवाडा विभागात राबवला जाणार आहे. ज्यामध्ये वनामकृवि, परभणी अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद, खामगाव, बदनापूर, तुळजापूर यांच्यामार्फत एक वर्षामध्ये प्रत्येकी ६ तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ज्याद्वारे शेतकऱ्याना कृषी यांत्रिकीकरणवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.यावेळी अटारी पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय यांनीही ऑनलाइन मार्गदर्शन केले. तसेच डॉ. देवसरकर, श्री. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. श्रीमती साह यांनी सी. एन. एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड) मार्फत करण्यात आलेल्या विविध कार्य व उपक्रमांची माहिती दिली.
श्री.सावंत यांनीही कंपनीच्या विविध उपक्रमाच्या माहितीचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. डॉ. उदय खोडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर झाडे यांनी केले.