सातारा, गाेंदिया, वाशिम, काेपरगावात पाेलिसांची धडाकेबाज कारवाई; गुटखा, पान मसाल्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्रात बंदी असताना देखील गुटख्याची विक्री तसेच वाहतुक हाेत असल्याचे सातत्याने झालेल्या कारवाईतून स्पष्ट हाेत आहे. राज्यातील सातारा, नाशिक, गाेंदिया, काेपरगाव आदी शहरात विक्रीसाठी नेत असलेल्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा पाेलिसांनी जप्त केला आहे. आनेवाडी टाेलनाका येथे कारवाई
पुण्याहून साताऱ्याकडे विक्रीसाठी आणला जाणारा गुटखा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आनेवाडी टोल नाका परिसरात जप्त केला. यामध्ये दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 8 लाख 16 हजारांचा गुटखा आणि 5 लाखाचे वाहन असा एकूण 13 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अमन सलीम शेख आणि अफसान हमीद शेख या पुण्यातील दोन युवकांना अटक करण्यात आली आहे.
गोंदियात कारवाई
गोंदिया शहर हद्दीत अवैध धंद्यावर आळा घालणाऱ्या एलसीबीच्या पथकाने सिंधी कॉलनी, रावण मैदान जवळ गोंदिया येथे प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा विक्री,साठा प्रकरणी एका घराची घरझडती घेतली असता. तेथे विविध प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे 596 पॅकेट वजन 73 किलो 665 ग्राम किंमती एक लाख 42 हजार405 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सागर बीसमलाल गोपलानी (वय 23) यास अटक करण्यात आली आहे.काेपरगावला कारवाई
कोपरगाव तालुका पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणारा कंटेनर नुकताच पकडला. इंदोरहून पुण्याकडे निघालेल्या कंटेनरमध्ये सोयाबीन आणि बेसनाच्या गोण्यांसोबत बेकायदा गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी येसगाव शिवारात सापळा लावून हा कंटेनर ताब्यात घेतला.
बेसन आणि सोयाबीनच्या गोण्यांमागे ५० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा लपवण्यात आला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्या वाहतुकीचा डाव फसला.
वाशिम जिल्ह्यात कारवाई
वाशिम जिल्ह्यात गेल्या ७ दिवसांमध्ये पोलिसांच्या विविध पथकांनी अवैध गुटखा विक्री प्रकरणी वेगवेगळ्या कंपनीच्या गुटख्याच्या ८४ कारवाया करून १२ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत ८८ आरोपींवर कारवाई करण्यात आली.