शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणाले, ‘मी पुन्हा येईल म्हणण्याची…’
राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेले दोन दिवस लोकसभा मतदार संघ निहाय आढावा घेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसकडुन सुरू आहे. स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्या-त्या मतदार संघातील आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत आहेत. अशातच कागल मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ, जळगाव ग्रामीणमधुन गुलाबराव देवकर त्यासोबतच अनिल पाटील हे नेते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
तर दुसरीकडे शिरूर मतदार संघातून यंदा खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील यांना लोकसभेचे तिकीट मिळेल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. तर शिरूर मतदार संघातून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे इच्छुक असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या होत्या. याचं कारण म्हणजे विलास लांडे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यानंतर विलास लांडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, ‘शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हे हेच उमेदवार असणार आहेत. त्यानंतर आज शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ‘आज शरद पवार साहेबांनी लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिरूर मतदार संघातील सर्व कामांचा त्यांनी आढावा घेतला. गेली निवडणूक मी ज्या मुद्यांवर जिंकली होती. ते सर्व मुद्दे प्रश्न मी सोडवले आहेत. तसेच आता काही दिवसात अनेक प्रकल्प शिरूर मतदार संघात येतील. मी माझ्या कामांचा संपूर्ण आढावा पवार साहेबांच्या समोर मांडला असं कोल्हे यांनी सांगितलं आहे. तर या पुढच्या काळात काम करण्याच्या सूचनाही शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर जो अंतिम निर्णय असेल तो पक्ष ठरवेल. साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण असंही कोल्हे यावेळी म्हणालेत.
त्यामुळे आता पुढे कोणत्याही चर्चा नको, सर्व पक्षांच्या नेत्यांच्या भेटी होतच असतात.त्यामुळे अकारण कोणत्याही चर्चा नको असंही कोल्हे म्हणालेत. तर पक्ष महत्वाचा आहे माणूस महत्वाचा नाही. तर पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य असेल. आम्ही कामाला लागलो आहेच असंही त्यांनी म्हंटलं आहे.
तर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कोल्हे म्हणाले की, पुन्हा येईल असं म्हणायला भीती वाटते. तर पक्षातील मोठे नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. पवार साहेबांनी कामाला सुरवात करा अस सांगितलं आहे असंही ते पुढे म्हणाले आहेत तर निवडणुकीसाठी ते तयार असल्याचंही ते म्हणालेत.