मराठवाड्यात वादळाचे थैमान; वीज पडून दोन ठार, तर १५ जनावरे दगावली
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील काही भागात वादळाने थैमान घातले. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी एक जण ठार झाला, तर १५ जनावरे दगावली. अनेक ठिकाणी वादळामुळे मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने घरांचे, विद्युत तारांचे नुकसान झाले. वादळाने फळबागाही जमीनदोस्त झाल्या. यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातील अंबलटेक येथे भरत गणपती मुंडे (वय ६०) यांचा वीज पडून मृत्यू झाला, तर आष्टी तालुक्यात वीज पडून दोन जनावरे दगावली. आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे वीज पडून एक बैल मयत झाला. जालना जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळवाऱ्यामुळे असंख्य झाडे उन्मळून पडली असून, महावितरणचे खांबही आडवे झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात रविवारी दुपारी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुदखेड तालुक्यातील केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्रीही वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव, धनज, बारड शिवारात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. केळी काढणीला आलेली असताना शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. रविवारी सायंकाळीही जिल्ह्यात काही भागांत वादळ-वारा आणि पाऊस सुरू झाला होता.
हिंगोली जिल्ह्यात पाऊस
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री व रविवारी दुपारी अडीच वाजेदरम्यान अवकाळी पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. ३ जून रोजी मध्यरात्री व ४ जून रोजी दुपारी अवकाळी पावसाने जिल्हाभर वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. ४ जून रोजी डोंगरकडा, औंढा नागनाथ, शिरडशहापूर, केंद्रा (बु,) कळमनुरी, वसमत, वरूड, वाकोडी, कुरुंदा, जवळाबाजार, आखाडा बाळापूर आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व हलकासा पाऊस झाला. खानापूर (मो.) शिवारात शेतकरी सखाराम पंढरीनाथ शिंदे यांची शेतात बांधलेली गाभण म्हैस दुपारी अचानक वीज पडून दगावली. गुंजोटी शिवारात राहुल पांडुरंग सुरकुटे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास बांधलेला बैल वीज पडल्याने दगावला.
औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून १ ठार; १४ जण जखमी
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांत रविवारी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. यावेळी गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद शिवारात शेतात काम करीत असताना वीज पडून कृष्णा रामदास मेटे (वय २२ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच सिल्लोड, गंगापूर, सोयगाव तालुक्यांमधील १४ जण जखमी झाले आहेत. वीज पडून आणि झाडे कोसळल्याने जिल्ह्यात ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने संबंधितांचे संसार उघड्यावर आले आहेत. झाडे उन्मळून पडल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.