ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात उपचार सुरू
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना यांची प्रकृती चिंताजनक आहे. सुलोचना या 94 वर्षांच्या आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुलोचना यांची कन्या कांचन घाणेकर यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधताना सांगितलं की, सुलोचना लाटकर यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. शनिवारी (3 जून) अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची तब्येत बिघडली आणि अशा स्थितीत त्यांना काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, मार्च महिन्यातही सुलोचना यांची तब्येत बिघडली होती आणि त्यानंतरही त्यांना श्वासोच्छवासाच्या आणि वयोमानाशी संबंधित इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी रुग्णालयात 3 आठवड्यांच्या उपचारांनंतर त्या बऱ्या झाल्या आणि डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला होता. मार्च महिन्यात सुलोचना यांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपचारासाठी रूग्णालयाला तीन लाख रुपयांची मदतही दिली होती. उपचारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात आला होता.
सुलोचना लाटकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य नायिकेपासून ते इतर भूमिकांपर्यंत काम केलं आहे, तर त्यांनी 250 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एक अभिनेत्री म्हणून सुलोचना यांनी चाळीशीच्या दशकात मराठी चित्रपटांतून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आणि अनेक हिट मराठी चित्रपट दिल्यानंतर त्या हिंदी चित्रपटांच्या नायिकाही बनल्या.
40 च्या दशकात सुलोचना लाटकर यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका बजावल्या, पण नंतर हिंदी चित्रपटांत ‘आई’ची भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख झाली. सुलोचना यांनी शेकडो चित्रपटांमध्ये मोठ्या नायक/नायिकेच्या आई आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भूमिका साकारल्या आणि एक पात्री अभिनेत्री म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला. एक आई म्हणून त्यांनी देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना यांच्या आईच्या भूमिका चित्रपटांमध्ये अनेकदा साकारल्या आहेत आणि एका मुलाखतीत देखील नमूद केले आहे की, या तीन नायिकांच्या आईची भूमिका साकारायला त्यांना आवडले.
सुलोचना यांनी 50 च्या दशकाच्या उत्तरार्धात आईच्या पात्रातील भूमिका साकारण्यास सुरुवात केली, त्याआधी त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये मुख्य नायिका म्हणून काम केलं आणि या काळात त्यांनी 40 आणि 50 च्या दशकातील अशोक कुमार, त्रिलोक कपूर आणि नजीर हुसेन यांसारख्या आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलं.
सुलोचना यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सुलोचना यांचे पूर्ण नाव सुलोचना लाटकर आहे, पण त्या सुलोचना या नावानेच प्रसिद्ध झाल्या आणि नेहमी त्या पडद्यावर याच नावाने ओळखल्या जायच्या.