महाराष्ट्रात ९१ उड्डाणपूल बांधणार : नितीन गडकरींची घोषणा
पुणे : महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि येथील वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता महाराष्ट्रात 91 उड्डाणपूल (आरओबी) बांधण्यात येणार आहेत. त्यातील सात उड्डाणपूल सध्या प्रस्तावित आहेत. आणि ९१ उड्डाणपूल उभारण्याची जबाबदारी आम्ही महारेलकडे सोपवली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दृकश्राव्य माध्यमातून बोलताना सांगितले.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने शिवाजीनगर येथील पोलीस ग्राउंड येथे रविवारी महाराष्ट्रातील ०९ उड्डाणपुलांचे लोकार्पण व ११ उड्डाणपुलांचे भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.
राज्यात अनेक ठिकाणी रेल्वे फाटक असून तिथे अपघाताची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या फाटकांचे रूपांतर उड्डाणपुलात करणे आवश्यक आहे. सेतू बंधन योजनेत अकरा उड्डाणपुल मंजूर करण्यात आले आहेत. येत्या काळात फाटक मुक्त रेल्वे उड्डाणपूल बांधून लोकांना सुरक्षित सेवा देऊ. लोकांना थांबावे लागत असल्याने त्रास होतो. महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.