मान्सून केरळमध्ये उद्या दाखल होणार तर राज्यात…
मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 5 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये, तर 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, तसेच अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत पोहोचलेला मान्सून तिथेच थांबलेला आहे. मान्सून पुढे सरकण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे दोन दिवस तरी आहे तीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात अनुकूल स्थिती येत्या काही दिवसांत तयार झाली, तरच मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत मान्सून दक्षिण अरबी सागराच्या काही भागांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, तसेच अंदमान निकोबार बेटाचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बराचसा भाग व्यापला आहे.
मात्र, सध्या 5 जूनला अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात चक्रीवादळ तयार होणार आहे. तसेच येत्या 48 तासांत याच भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. 8 आणि 9 जूनला उत्तर अंदमान बेटांपासून ते म्यानमारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. हे क्षेत्र म्यानमारच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. या सर्व स्थितीमुळे मान्सूनचा प्रवास थांबला आहे.