कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे डील झाले हॉटेलमध्ये, शिवसेनेचा आरोप
कोल्हापूर : नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्त्यांसाठी मंजूर १०० कोटींच्या निधीचे काम एकाच ठेकेदारांकडून करून घ्यावे, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.तरीही टक्केवारीसाठी चार निविदा काढण्यासाठीचे डील शहरातील एका हॉटेलमध्ये झाले. यामध्ये दोन माजी आमदार आणि चार ठेकेदार सहभागी झाले. विशेष म्हणजे त्यावेळी हॉटेलमध्ये शहर अभियंता हर्षजित घाटगे हेही उपस्थित होते, असे गंभीर आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून शुक्रवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासमोर करण्यात आले.
रस्ते कामाच्या निविदेसंबंधीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळातर्फे प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि सुनील मोदी यांनी महापालिका अधिकारी अधिक टक्केवारी मिळत असलेलीच कामे करत आहेत, असे म्हणत घाटगे यांना धारेवर धरले.
मोदी म्हणाले, रस्त्यासाठी मंजूर निधीची खास बाब म्हणून चार निविदा काढून चार जणांना ठेेका देण्यासंबंधी शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. स्थानिक आमदारांनी दिलेल्या पत्राचा विचार न करता माजी आमदार अमल महाडिक यांनी दिलेल्या पत्रानंतर शासनाकडे मार्गदर्शन कसे मागितले जाते ? महापालिका अधिकाऱ्यांना काही अधिकार आहेत की नाही ? हॉटेलमध्ये बसून चार निविदा काढणे, ठेकेदार निश्चित करण्याचे काम अधिकारी कसे करू शकतात ? याचा खुलासा घाटगे यांनी करावा. निविदा निश्चित करताना घाटगे हॉटेलमध्ये गेले होते की नाही ? हे सांगावे. अन्यथा आम्ही घाटगे हॉटेलमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना दाखवू. हॉटेलमध्ये बसून घाटगे यांनी इतर विकास कामांच्या एनओसी दिल्या आहेत.
पवार म्हणाले, आमचा विकासाला विरोध नाही; पण भ्रष्टाचाराला विरोध आहे. शहर अभियंत्यांना मी तुम्हाला खुर्चीवर बसवले आहे. माझे ऐकायचे, अशी धमकी दिली जात आहे. शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह, स्मशानभूमीत सेवा, सुविधा निर्माण करणे अशी कामे करण्याऐवजी जास्त टक्केवारी मिळेल ती कामे केली जात आहेत.
प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, निविदा किती काढाव्यात याचे मार्गदर्शन शासनाकडे मागितले आहे. मार्गदर्शन आल्यानंतर अंमलबजावणी केली जाईल. निविदेचे काम नियमानुसारच होईल. मी जोपर्यंत कोल्हापुरात आहे, तोपर्यंत महापालिका, कोल्हापूरशी प्रामाणिक आणि निष्ठेनेचे काम करणार आहे. कोणी चूक केली तर त्यांच्यावर कारवाईही केली जाईल.
बैठकीस माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, हर्षल सुर्वे, राजेंद्र पाटील, धनाजी दळवी, दीपाली शिंदे, स्मिता सावंत आदी उपस्थित होते.
पाच जणांची पत्रे
रस्ते कामाच्या निविदेसंबंधी खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार अमल महाडिक या पाच जणांनी पत्रे दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चहा प्यायला हॉटेलमध्ये गेलो…
निविदेच्या विषयात हॉटेलमध्ये गेला होता-नाही, याचे थेट उत्तर द्या, अशी विचारणा मोदी यांनी केल्यानंतर घाटगे यांनी हॉटेलमध्ये चहासाठी गेलो होतो, असे सांगितले.
ते पडलेले आमदार आहेत?
अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काम करून घेणारे ते कोण आहेत? ते कोल्हापूरचे राजे आहेत का? ते पडलेले आमदार आहेत, अशी टीका मोदी यांनी क्षीरसागर यांचे नाव न घेता केली. शनिवारपेठेतील त्यांच्या घरात अधिकारी वांरवार कसे जाऊ शकतात, अशी विचारणाही त्यांनी केली.
ते माजी आमदार
विद्यमान आमदारांनी दिलेल्या पत्राकडून दुर्लक्ष करून माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्राची दखल घेतली जाते. ते माजी आमदार आहेत, असेही मोदी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.