महत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

वन्यजीवांच्या जीवावर उठलेले महामार्ग, रेल्वे, कालवे आणि वीजवहिन्या


 

अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने या संरक्षित वनक्षेत्रांमध्ये तसेच व्याघ्र प्रकल्पांमध्ये वन्यजीव संख्यावाढ होऊन ते आता नजीकच्या जंगलांमध्ये पसरू लागल्याचे चित्र विदर्भासारख्या भूप्रदेशांमध्ये दिसते. त्याचवेळी या जंगल क्षेत्रांमधून जाणारे रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग, कालवे, वीजवाहिन्या यामध्ये अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. थोडक्यात, हे एकरेषीय प्रकल्प वन्यजीवांच्या जीवावर उठल्याचे दिसून येेते. वन्यप्राण्यांचे हे अपघात थांबविणे शक्य आहे का? या प्रश्नावर प्रभावी उपाय सुचविणारा वन्यजीवप्रेमी किशोर रिठे यांचा हा लेख!

नव्यानेच बांधण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर काळविट धावत असतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर खूपच प्रसिद्ध झाला. त्यामुळे हा महामार्ग वन्यप्राण्यांसाठी तसेच प्रवासी वाहतुकीसाठी कसा धोकादायक ठरू शकतो, यावर चर्चा रंगल्या. तेव्हाच नाशिक-पुणे महामार्गावर चंदनपुरीनजीक एक बिबट्या महामार्ग ओलांडताना धडक लागून कारच्या चाकात अडकून पडल्याचा थरारक व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या घटनांनी हे महामार्ग वन्यप्राण्यांच्या संचारात कसे बाधा उत्पन्न करीत आहेत, हे सिद्ध केले. महामार्ग व रेल्वेमार्गांवर यापूर्वीही सातत्याने अशा घटना घडल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जानेवारी २०१० ते जानेवारी २०२१ या ११ वर्षांमध्ये संपूर्ण देशात रस्ते, महामार्ग व रेल्वेमार्ग यामधील अपघातांमध्ये सुमारे २६ वाघ व बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. यामधील सर्वाधिक दहा घटना महाराष्ट्र, तर सहा घटना या मध्य प्रदेशातील आहेत. या २६ घटनांमध्ये १४ घटना रेल्वेमार्गांवर, तर १२ घटना महामार्गांवर घडल्या आहेत.

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग-७ (सध्या ४४) तर वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. नागपूर-सिवनी महामार्गावर मनसरपासून, जंगलाचे आच्छादन रस्त्याला कवटाळायला लागते. प्रवासी वाहनांना हे हिरवेपण, जंगलातील गारवा, कानावर पडणारे पक्ष्यांचे आवाज, रस्त्यावर धावणारी माकडं आणि क्वचितच रस्ता ओलांडून जंगलात दिसेनासे होणारे वन्यजीव हे सारे मनाला भावणारे असायचे. अगदी सिवनीपर्यंतचा प्रवास त्यामुळे स्वर्गीय आनंद देऊन जायचा. पण, आता या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. त्यासाठी येथील वनश्रीची कत्तल करण्यात आली. मध्य प्रदेशातील पेंच राष्ट्रीय उद्यानापासून जाणार्‍या ८.७ किमी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वन्यजीवांना जास्त धोका उत्पन्न झाला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे या भागात १३ उड्डाणपूल बांधून देण्याचे मान्य करण्यात आले. या चर्चा होत असतानाच या महामार्गावर वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू होत होते.

२०११ मध्ये येथे बिबट्या, तडस व अस्वलाचा अपघात होऊन मृत्यू झाला, तर २०१२ मध्ये यात दोन बिबटे, दोन अस्वल आणि २०१३ मध्ये पाच अस्वले, २०१५ मध्ये दोन तडस व दोन बिबटे येथे मृत्युमुखी पडले होते. यानंतर या महामार्गावर जानेवारी २०१६ मध्ये ‘वन्यप्राणी उपशमन योजना’ सुचविण्यात आल्या. त्यानुसार ३०० मीटर लांबीचे दोन वन्यजीव भुयारी पूल र्(ीपवशीरिीीशी) एक ७५० मीटर लांबीचा, तर सहा ५०, ६० आणि ८० मीटर लांबीचे वन्यजीव भुयारी पूल एका समितीच्या निगराणीखाली बनविण्यात येतील, असे ठरले. सन २०१८ मध्ये या सर्व उड्डाणपुलांचे व वन्यजीव भुयारी मार्गिकांचे काम पूर्ण झाले. भारतीय वन्यजीव संस्थेने या मार्गिकांचा वन्यजीव खरेच वापर करतात काय, याचा कॅमेरा लावून अभ्यास केला असता, वाघासह इतर वन्यप्राणी या मार्गिकांचा वापर करीत असल्याचे दिसून आले. तरीही उड्डाणपूल व वन्यजीव मार्गिका नसलेल्या ठिकाणावरून रस्ता ओलांडताना बिबट व इतर वन्यप्राण्यांचे अपघात होणे सुरूच राहिले.

त्यामुळे दि. २५ जानेवारी २०२२ रोजी या महामार्गावर मनसर ते पवनी दरम्यान एक वाघ मृत्यू पावला. दि. २ फेब्रुवारी २०२० रोजी एक वाघ देवलापारनजीक जखमी झाला, तर दि. २४ जानेवारी २०२० हिराकुंड नाल्याजवळ एक बिबट्या मृत्यू पावला. दि. ३ फेब्रुवारी २०१९ ला वाघ जखमी, २४ जानेवारी २०१९ ला व १६ डिसेंबर २०१८ बिबट्याचा मृत्यू तर १० फेब्रुवारी व दि. ३१ मे २०१८ रोजी चितळ व दि. ११ जानेवारी २०१८ रोजी बिबट्याचा मृत्यू असे अपघात या येथे नोंदविण्यात आले. ‘वन्यजीव उपशमन योजना’ राबविणारा हा देशातील पहिला प्रयोग असल्याने येथे काही उणीवा राहिल्यात असे म्हणता येईल.

नवेगाव व नागझिरा यामधून रायपूर जाणार्‍या राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक सहावर सुद्धा अनेक वन्यप्राण्यांचे बळी गेले. दि. २८ ऑक्टोबर २०१६ ला ‘महामार्ग प्राधिकरण’ व ‘राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण’ यांच्यामध्ये एकमत होऊन ७०० मीटर लांबीचा चौथा वन्यजीव भुयारी पूल बांधण्याचे निश्चित झाले. यापूर्वी महामार्ग प्राधिकरण ७५० मीटरचे असे फक्त तीन पूल बांधण्यास तयार होते. भंडारा-रायपूर या राष्ट्रीय महामार्गावर पाच उड्डाणपूलांसह संपूर्ण ११० किमी मार्गावर एकूण १९ उड्डाणपूल बांधण्याचे मान्य केले.

हाच राष्ट्रीय महामार्ग-६ पुढे कळमेश्वर-कोंढाळी-बोर व्याघ्र प्रकल्पातील बाजीरावसारख्या वाघ व इतर वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरला. ताडोबा-उमरेड-बोर संचारमार्गातील प्रस्तावित नऊ रस्तेसुद्धा वन्यप्राण्यांच्या संचारास धोकादायक आहेत. या प्रकरणी ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने वन्यप्राणी उपशमन योजना आखल्याशिवाय रस्ते विकास करू नका, असे ठणकावून सांगितल्याने संबंधित विभागाने काही रस्त्यांवरून आता माघार घेतली आहे. विदर्भातील चंद्रपूर ते मुल हा रस्ता वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने वन्यप्राण्यांचे सातत्याने बळी घेणारा ठरला. एप्रिल २०१५ मध्ये वनविकास महामंडळाच्या जंगलालगत जुनोना ते गीलबिली रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत सव्वा वर्षाच्या मादी वाघिणीचा रात्रीच्या वेळी बळी गेला. जुनोना गावच्या लोकांनी हे वाघाचे पिलू मृतावस्थेत पडून असल्याची माहिती वनविभागाला दिली. अखेर रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्याच्या सूचना वनविभागाने सध्या दिल्या आहेत.

सन २००४ मध्ये मेळघाट मधील धारणी-परतवाडा राज्य महामार्गावरील रात्रीची वाहतूक नियंत्रित करण्यात आली. तरीही परतवाडा-धारणी-खंडवा महामार्गावर वन्यजीवांचे अनेक अपघात घडले. दि. १६ मार्च २०१० रोजी या रस्त्यावर मांगीया गावाजवळ एका १५ महिन्यांच्या बिबट्याच्या पिलाचा पहाटेच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. या महामार्गावर तीन महिन्यात हा तिसरा मृत्यू होता. यानंतर या रस्त्यावरील विशेषतः ट्रकची रात्रीची वाहतूक बंद करण्याची मागणी पुढे आली. यापूर्वी धारणी-हरिसाल-अकोट व धारणी-ढाकणा (अंबापाटी) खोंगडा मार्ग रात्रीच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटी ते वडनेर या ५१ किमी लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जुलै २०१७ मध्ये सुरु होते. परंतू हा रस्ता टिपेश्वर अभयारण्य व पैनगंगा अभयारण्य यांच्यामधील वन्यजीव संचारमार्गातून जातो. ताडोबा आणि कावल व्याघ्र प्रकल्प (तेलंगण) यांना जोडणारा संचारमार्ग याच जंगलाशी संलग्न आहे. त्यामुळे यावर पुरेशा उपाययोजना केल्या नाहीत, तर वन्यप्राण्यांचे अपघातात बळी जातील, या आशयाचे पत्र वन विभागाने ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’स लिहिले. पण, त्याकडे दुर्लक्ष करून चौपदरीकरणाचे काम सुरु झाले. असेच अपघात यवतमाळ जिल्हात नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग-३६१ वर केळझर नर्सरीनजीक नोंदविण्यात आलेत.

२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘स्टेट ऑफ एन्व्हायर्नमेंट’ अहवालानुसार २०१७-१८ या एका वर्षात संपूर्ण देशात रस्ते आणि रेल्वे अपघातामध्ये तब्बल १६७ वन्यप्राणी मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे. यामध्ये अगदी मगरीपासून, ते हत्तींपर्यंत १९ प्रजातींच्या वन्यप्राण्यांचा समावेश होतो. यापैकी वाघ, बिबटे, सिंह व इतर वन्यप्राणी रस्ते तसेच रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. याबाबत केंद्र सरकारच्या वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०१५-२०१८ या तीन वर्षांमध्ये रेल्वे व रस्ते अपघातात १९४ बिबटे, ११ वाघ व पाच सिंह मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले. रानकुत्रे, अस्वल, तडस, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाय या प्राण्यांची आकडेवारी राज्यांकडे असल्याने ती एकत्रितरित्या उपलब्ध नाही. अर्थात, माकडे, साप, इतर उभयचर प्राणी, रानमांजर, सायळ, पक्षी यांचे या अपघातांमध्ये असणारे प्रमाण खूपच जास्त आहे. परंतु, त्यांची राज्यांच्या वनविभागाच्या दप्तरी बहुतांश वेळा नोंद न झाल्याने त्यांच्या मृत्यूचा प्रत्यक्ष आकडा समोर येत नाही.

एकरेषीय प्रकल्पांमध्ये सर्वाधिक वन्यप्राण्यांचे सर्वाधिक बळी हे वन्यजीव अधिवासांमधून जाणार्‍या महामार्गांवर नोंदविले जातात. त्यामुळे अशा निवडक महामार्गांवर पर्यायी उपाययोजना आता हाती घेतल्या जात आहेत. पेंच राष्ट्रीय उद्यानातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ४४, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तुंगारेश्वर अभयारण्य यांच्या संचार मार्गातून जाणारा मुंबई-अहमदाबाद मल्टीमोडल कॉरिडोर या सध्या विकसित होणार्‍या रस्त्यांवर आता ‘वन्यप्राणी उपशमन योजना’ उभारण्यात येत आहेत. याद्वारे विकास प्रकल्प रेटतांनाच वन्यजीवांनाही संरक्षण मिळणार आहे. परंतु, आधीच अस्तित्वात असणार्‍या रस्त्यांसाठी मात्र अद्यापही निधीचा ठणठणाट आहे.

या एकरेषीय प्रस्तावित प्रकल्पांची संख्या व त्यांचा वन्यजीव अधिवासांवरील दुष्परिणाम लक्षात घेता, सन २०११ मध्ये या विषयावर केंद्रीय वन्यजीव मंडळामध्ये गंभीर चर्चा झाली. त्यानंतर मंडळाच्या स्थायी समितीने याविषयावर एक विचार पत्रिका (लेपलशिीं रिशिी) तयार केली. सन २०१६ मध्ये भारतीय वन्यजीव संस्थेने एक पाउल पुढे जाऊन याच विषयासंबंधी सर्व संबंधित विभागांसाठी मार्गदर्शक अहवाल तयार केला. यामध्ये जंगलातून व वन्यजीव अधिवासांमधून जाणार्‍या रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग व वीजवाहिन्या यासंबंधी करावयाच्या वळण मार्गासारख्या पर्यायी व वन्यजीव भुयारी मार्गासारख्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक उपाययोजना नमूद करण्यात आल्यात. दि. ७ फेब्रुवारी २०१७ रोजी देशाच्या सर्वोच्य केंद्रीय वन्यजीव मंडळाने वन्यजीव अधिवासातून रस्ते, रेल्वे यासारखे एकरेषीय प्रकल्प घेतांना त्यावर वन्यजीव अधिवासांना पर्यायी व प्रतिबंधात्मक उपाययोजना सादर करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिलेत. रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही या भूमिकेचे समर्थनच केले आहे.

त्यामुळे संबंधित यंत्रणांमध्ये याविषयी जागरुकता निर्माण झाली. मागील तीन वर्षांमध्ये राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे या विभागांनीही धोरणात्मक निर्णय घेऊन वन्यजीव अधिवास वगळूनच नवे प्रकल्प आखण्याचे धोरण राबविले आहे. असे असले तरी अजूनही रस्ते निर्मिती करताना संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती दाखविणार्‍या अनेक घटना घडतांना सर्रास पाहायला मिळतात. भारत सरकारच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना व शासकीय अध्यादेश असतानाही अजूनही या यंत्रणा रेल्वेलाईन व रस्ते पुरातन काळापासून आहेत. त्यामुळे आम्हाला वनसंवर्धन कायदा व वन्यजीव संरक्षण कायदा याअंतर्गत कोणत्याही परवानगीची गरज नाही, अशी मुजोर भूमिका घेतात. अशा विकासविरोधी भूमिकेमुळेच आज हे विनाश प्रकल्प बनून वन्यजीवांच्या जीवावर उठले आहेत. हे बदलणार नाही तोपर्यंत भारतातील वन्यजीवांचा कालवे व वीजवाहिन्यांमध्ये बळी जातच राहणार, हे स्पष्टच आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button