फेरीवाल्यांनो, 10 ते 50 हजारांचं बिनव्याजी कर्ज हवंय? मग ‘या’ योजनेसाठी करा अर्ज
आग्रा : कोरोना कडक लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सुरू होत्या. शिवाय अनेक खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना दिली होती. परंतु रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त असल्याने पथविक्रेत्यांचे मात्र प्रचंड हाल झाले. लॉकडाऊन संपल्यावर आपलं काम पुन्हा सुरू होईल की नाही, याचीही त्यांना शाश्वती नव्हती. अशा सर्व पथविक्रेत्यांना मदतीचा हात आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद म्हणून मोदी सरकारने ‘पीएम स्वनिधी’ योजना सुरू केली. विविध राज्यांमधील लोक या योजनेचा लाभ घेताना दिसतात.
उत्तर प्रदेशच्या आग्रा भागात तर तब्बल 40,000 हून अधिक पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला नवा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे या सर्व विक्रेत्यांचा जिल्हा नागरी विकास विभागाकडून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना 10 ते 50 हजारांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं. आग्रा जिल्हा नागरी विकास विभागाने शहरातील 41,000 हून अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं ध्येय निश्चित केलं होतं, ते आता जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
विभागाकडून आतापर्यंत 40,000 हून अधिक पथविक्रेत्यांना 10,000 रुपयांचं कर्ज देण्यात आलं आहे. तसेच ‘तुम्हाला रस्त्याकडेला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, मात्र पुरेसं भांडवल नसेल, तर आग्रा महानगरपालिकेत असलेल्या आमच्या विभागास भेट द्या’, असं आवाहनही या विभागाकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर विभागाच्यावतीने तुम्ही स्वतः या योजनेसाठी कसा अर्ज करू शकता, याबाबतही माहिती देण्यात आली आहे.