नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला
नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली आहे. आज शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन सुरु असताना याच सुमारास एका व्यक्तीने शिवसेना कार्यालयासमोरच संजय राऊत यांच्या बाजूने घोषणाबाजी केलीयावरून शिवसेना कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला धक्काबुक्की करत गोंधळ घातला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत वाद सोडविला आहे.
आज संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून ते त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेले आहेत. अशातच संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीवरून राजकीय वातावरण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरु असून नाशिकमध्ये देखील आंदोलन करण्यात येत आहे. याच सुमारास शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या मायको सर्कल परिसरातुन संजय राऊत यांचा ताफा त्र्यंबककडे रवाना झाला. याचवेळी एका व्यक्तीने मध्यवर्ती कार्यालयासमोरच संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. हे पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला धक्काबुक्की करत बाहेर काढले. पोलिसांनी मध्यस्थी करत सदर व्यक्तीला बाजूला नेले. घोषणाबाजी करणारा व्यक्ती कोण होता, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
सदर व्यक्ती संजय राऊत यांचा ताफा जात असताना शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाबाहेर उभा राहवून ‘संजय राऊत अंगार है, बाकी सब भंगार है’, अशा घोषणाबाजी करत होता. याचवेळी शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळे पोलीस देखील तैनात होते. मात्र सदर कार्यकर्त्याने घोषणाबाजी चालूच ठेवल्यामुळे शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील संजय राऊत विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. लागलीच पोलिसांनी मध्यस्थी करत सदर व्यक्तीला पोलीस व्हॅनमधून बाजूला नेले.
मी कुणावर थुंकलो नाही….
तर गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान थुंकण्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. यावर स्पष्टीकरण देताना दे म्हणाले की, “मी कुणावर थुंकलो नाही.” वीर सावरकरांचे उदाहरण देत ते म्हणाले की, वीर सावरकर यांचे भक्त आहेत, त्यांना न्यायालयात आणले असताना त्यांची माहिती देणारे व्यक्ती होते. त्यावर ते थुंकले होते. दाताखाली जीभ खाली आली, म्हणून थुंकलो, असेही ते म्हणाले. तर यावर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे, ते म्हणाले की, “धरणामध्ये XXXपेक्षा थुंकणं चांगलं आहे. ज्याचे जळतं त्याला कळतं, त्यामुळे माझ्या पक्षाशी मी प्रामाणिक आहे. आमचा भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रयत्न नाही.”