वटपौर्णिमा आणि महिलांच्या आरोग्याचा काय आहे संबंध?

जेष्ठ महिन्यात येणार्या पौर्णिमेला वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते म्हणून याला वटपौर्णिमा असे म्हटले जाते. वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मातील महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात.
वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे.
एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही हाच त्यामागचा उद्देश आहे. सहाजिकच या कृतीमुळे वृक्षतोडीला आळा बसून निसर्गाचा समतोल राखला जातो.
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाप्रमाणेच माझ्या कुटुंबाचा विस्तार व्हावा अशी धारणा मनात ठेऊन हे व्रत केले जाते.
अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.
आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वटवृक्षापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.
वटवृक्षाची उंची सुमारे तीस मीटर पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी असून प्राणवायूचा मुबलक पुरवठा हे झाड करत असतं. स्त्रियांचे शरीर हे पुरूषांच्या तुलनेत संवेदनशील असून स्त्रियांचे आरोग्य उत्तम रहावे हा दूरगामी विचार या व्रतामधून दिसून येतो.
त्यामुळेच या पूजेच्या निमित्ताने वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता करण्यासारखं आहे.
या बहुगुणी वडाचे फायदे:-
केसांचे आजार – वडाची वाळलेल्या पानांची 20 ग्रॅम राख 100 मिलिलिटर जवसाच्या तेलात मिसळून कोमट करून डोक्यावर मालिश केली असता केसांचे आजार दूर होतात. तसेच केसांची मुळं घट्ट होऊन केस लांबसडक होण्यास मदत होते.
सर्दी, ताप, डोकेदुखी- वडाची तांबूस पाने सावलीत सुकवून वाटून घ्यावीत. अर्धा लीटर पाण्यात अर्धा चमचा वाटलेली पूड टाकून पाणी उकळून घ्यावे. अर्धे पाणी आटल्यानंतर त्यात तीन चमचे साखर टाकून सकाळ-संध्याकाळ चहाप्रमाणे पिल्यास सर्दी, ताप आणि डोकेदुखीला आराम मिळतो.
गर्भपात होणे – वडाची सुकलेली साल दुधाच्या साईसोबत घेतल्यास गर्भपात होत नाही. 5 ग्रॅम वडाची सुकलेली साल बारीक वाटून त्यात थोडा मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्यास गर्भपात होण्यापासून मुक्ती मिळते.
भाजलेल्या त्वचेवर उपयुक्त- भाजलेल्या त्वचेवर गायीच्या दह्यात वडाची वाळलेली पाने वाटून लावल्यास दुखणं कमी होतं आणि जखम लवकर बरी होते.
ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा- वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो. त्यामुळे त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांना सहजपणे शुद्ध प्राणवायू मिळत असतो. एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढण्यासारखं आहे.











