पंतप्रधान कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात
नाशिक : ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मेपासून कुसुम योजनेचे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे.
तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्धीनुसार पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालय, नाशिकचे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.
१३ जानेवारी २०२१ रोजी १ लाख सौर कृषिपंप व ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील १ लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली.
राज्य शासनाकडून १२ मे २०२१ रोजी राज्यात या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी एक लाख नग या प्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये ५ लाख कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले.
या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.