मान्सूनपूर्व पावसाने कारल्याची बाग भुईसपाट; उत्तरपूर्व भागात गारासह वादळी पाऊस
उन्हाळ्यात भाजीपाल्याला भाव मिळतो, दोन पैसे हातात राहतील या आशेने विखरणी येथील बापूसाहेब विठ्ठलराव शेलार यांनी एक एकर कारल्याची बाग लावली होती. ऐन फळ येण्याच्या व उत्पन्न मिळण्याच्या काळातच वादळ व पावसाने संपूर्ण बाग भुईसपाट झाली आहे.
पाच महिने जिवापाड जपलेले पीक ऐन काढणीच्या काळातच नष्ट झाल्याने शेलार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे.मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील उत्तर भागाला काल (ता.२९) चांगलेच झोडपून काढले. सुमारे एक तास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
काढलेला उन्हाळ कांदा ओला झाला असून मिरची, टोमॅटो लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात होताच नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला होता.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसोबत शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली. पावसामुळे नुकताच काढून ठेवलेला कांदा भिजला, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल दाट लग्नतिथी असल्याने दुपारनंतर लग्नविधी सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धावपळ झाल्याचे पहायला मिळाले.
दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जना आणि विजांचा कडकडात करत पावसाला सुरुवात झाली. सुरवातीला पावसाच्या हलक्या सरी आल्या; मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि जोरदार पावसाने गारांसह एक तास झोडपून काढले.
अचानक आलेल्या पावसामुळे खळ्यात, मळ्यात उघड्यावर नुकताच काढून ठेवलेला कांदा भिजला. अगोदरच कांद्याला भाव नाही, त्यात कांदा भिजल्याने खराब झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यापासून तापमानात मोठी वाढ होऊन पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत गेला आहे, त्यामुळे जीव घेणाऱ्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.तातडीने पंचनामे करावेत
विखरणी येथील बापूसाहेब शेलार यांनी एक एकर कारले बाग लावली होती. मेहनत करून व भांडवल गुंतवून त्यांनी बाग फुलविली होती.
कारले येऊन बाजारात चांगला भाव असल्याने दोन पैसे मिळण्याची अपेक्षा असतानाच वादळाने बाग पडल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती बापू शेलार यांनी दिली आहे. महसूल व कृषी विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
तांदूळवाडी परिसरात गारपीट!
सकाळपासून उष्मा, दमट वातावरणाने सर्वांना असह्य करतानाच तालुक्यातील उत्तर भागात सोमवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान व नंतर चारनंतर तालुक्यातील अनकाई, अनकुटे, धनकवाडी, तांदूळवाडी, आहेरवाडी आदी परिसरात मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने हजेरी लावली.
तांदूळवाडी फाटा, अनकुटे आदी ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटे गारांचा पाऊस देखील झाला. गारा बोराच्या आकाराच्या होत्या, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह हा पाऊस झाला.