कोकणात पाऊस, पुढच्या पाच दिवसांमध्ये काय असतील हवामानाचे तालरंग? जाणून घ्या
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाच 2 ते 3 अंशांची घट नोंदवली जात आहे. तर, काही जिल्हे मात्र याला अपवाद ठरत आहेत. कारण, तेथील पारा अद्यापही चाळीशीच्या वरच आहे.अशा परिस्थितीत कोकणात मात्र आता मातीचा सुगंध दरवळू लागला आहे, कारण कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढली असून, आता तेथील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
मंगळवारी (30 मे 2023) सिंधुदुर्गातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. साधारण 15 मिनिटं वादळी वारा आणि मुसळधार पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे थोडा दिलासा मिळाला. असं असलं तरीही आंबा पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यातून अवकाळीची माघार नाहीच
तिथे वाशिम शहरासह जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. ज्यामुळं उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर, तर या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीला वेग येणार असल्याचंही म्हटलं गेलं. परभणी जिल्ह्यात तुफान पाऊस मात्र बरंच नुकसान करून गेला.
मान्सूनचा प्रवास कोणत्या दिशेला?
मान्सूनच्या प्रवासागची गती पाहता सध्या हे वृत्त अनेकांनाच सुखावणारं ठरत आहे. सध्या संपूर्ण अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मान्सून पोहोचला आहे. यंदा अपेक्षित तारखेच्या दोन दिवस आधी (१९ मे) मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानात दाखल झाला. पुढे मात्र त्याच्या प्रवासात व्यत्यत आला. आता मात्र पुन्हा एकदा मान्सूनच्या दृष्टीनं अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार होत असून, तो 4 जूनपर्यंत एक एक टप्पा ओलांडत केरळात दाखल होणार हे जवळपास निश्चित.पुढच्या पाच दिवसात बदलणार हवामानाचे तालरंग?
स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 5 दिवस हवामान समाधानकारक असून, कमाल तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाईल. तर कुठे पावसामुळं हवेत गारवा निर्माण झालेला असेल. पुढच्या 24 तासांमध्ये देशातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागात सोसाट्याचा वारा आणि पावसाची हजेरी असेल. तर, कर्नाटकचा दक्षिण भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि हिमाचलच्या काही भागात पावसाची हजेरी असेल. हिमालयाच्या पट्ट्याकडे असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये काही भागांत बर्फवृष्टीही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.