मुबीन सय्यद शेवटी त्याने करून दाखवलेच…
मुबीन सय्यद शेवटी त्याने करून दाखवलेच……..
मुबीन सय्यद रा. ता. जि. बीड एस.टी.भरती 2019 मधील पुणे विभागातील मुलांसाठी लढला व जिंकला.मुबीन सय्यद हे नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.याचे कारणही तसेच आहे.एसटी महामंडळाने 2019 मध्ये दुष्काळग्रस्त भागातील मुलांना न्याय देण्यासाठी चालक तथा वाहक पदाची 4416 जागांची सरळ सेवा भरती 12 विभागांसाठी भरती काढली होती. त्यामध्ये 11 विभागात ही भरती पूर्ण झालेली होती.पण फक्त पुणे विभागात ही भरती मागील चार वर्षापासून थांबलेली होती. सुरुवातीला त्यांना कोरोनाचे कारण सांगितले गेले, मग एस.टी.चा संप झाला, त्यानंतर या भरतीवर स्थगिती आली, मग राज्यात सत्ता बदल होऊन शिंदे – फडणवीस सरकार आले. त्यांनी या भरतीवरील सगती उठवली तरी पण पुणे विभागातील मुलांची भरती चालू होत नव्हती.त्यांना दरवेळेस भोसरी येथील ट्रायल ट्रॅक नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले जात होते.अशात मुलांचे वय निघून जात होते, मुलांचे लग्न या नोकरीच्या भरवशावर थांबले होते, दुसरीकडे नोकरीही करता येत नव्हती, स्वतःचा व्यवसाय करायचा म्हटल्यावर पैसे नाहीत. अशा अनेक समस्या या मुलापुढे होत्या. तरी पण याची जिद्द, त्याचे नियोजन, आणि त्याला त्याच्या टीमकडून मिळालेली साथ यावर त्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपाध्यक्ष एस टी महामंडळ, महाव्यवस्थापक एस टी महामंडळ, विभागीय नियंत्रक पुणे, यांच्यापासून अनेक मंत्री, खासदार, आमदार यांना सारखा पाठपुरावा करत राहिला. पण यश येत नव्हते. म्हणून या भरती मधील पूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 200 मुलांना घेऊन 20 फेब्रुवारी 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले होते. त्यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष श्री शेखर चन्ने साहेब यांनी त्यांना आश्वासन दिले होते की येणाऱ्या 1 मे पर्यंत भोसरी येथील ट्रायल ट्रॅक दुरुस्त करून तुमच्या अंतिम निवड याद्या जाहीर करू. पण 1 मे नंतरही तो ट्रॅक चालू झाला नाही. त्यानंतर परत याने सर्व मुलांना एकत्र जमा करून 15 मे पासून आझाद मैदान मुंबई येथे पुन्हा एकदा आंदोलन केले व एसटी महामंडळाने सुद्धा त्यांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली. व त्यांना लेखी स्वरूपात भोसरी येथील ट्रायल ट्रॅक सुरू करण्याचे पत्र दिले.आणि शेवटी या मुलांना जगण्याचे नवा मार्ग, नवी दिशा या बीड जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात राहत असलेल्या मुलाने दाखवून दिली. बीड जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात राहत असलेल्या त्याला आई-वडिलांची छत्रछाया लहानपणीच हरवली. त्याच्या चुलत्याने त्याचा सांभाळ केला व शेवटी ते ही त्याला सोडून गेले. या मुलाचे दुर्दैव त्याच्या आई-वडिलांचा चेहरासुद्धा याने बघितला नाही. त्याच्या चुलत्याची शेवटची इच्छा होती की याने कुठेतरी शासकीय नोकरीला लागावे आणि त्यांच्या इच्छेसाठीच हा मुलगा पूर्ण महाराष्ट्रातील 1647 मुलांसाठी 4 वर्षापासून लढत होता, झटत होता. ही भरती पूर्ण व्हावी म्हणून कित्येक वेळा मुंबई, पुणे, मंत्रालय, येथे चकरा मारल्या शेवटी त्याच्या या मेहनतीला फळ भेटले आहे. त्याचे आझाद मैदान मधील रडत केलेले भाषण सर्व काही सांगून जाते. त्याचे ते आनंदाश्रू त्याची सर्व मेहनत सांगत होते. त्याने या आनंदात एसटी महामंडळ सेंट्रल ऑफिस मधील सर्व कर्मचाऱ्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला. यासाठी त्याला प्रदीप चव्हाण, दिनेश शिंदे या मुलांचे व शेवटी धाराशिव चे शिवसेनेचे नेते तुकारामाम शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शेवटी सांगायचं तात्पर्य हेच प्रयत्न करत राहिल्यास देव त्यामध्ये यश नक्की देतो.