मृतदेह आढळला,७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या..
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवापूर येथे एका ७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तुकाराम धोंडबा काळसर्पे असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर अज्ञात व्यक्तीने तुकाराम काळसर्पे यांची हत्या केली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
गळा आवळून केली हत्या: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवापूर गावा जवळ असलेल्या पेट्रोल पंप परिसरात एकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती समजली. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्या ठिकाणी तुकाराम धोंडबा काळसर्पे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या दुपट्याने गळा आवळून केली असावी, असा अंदाज प्राथमिक तपासात लावण्यात आला आहे.
अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल: उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरावा शिवारात मृतक तुकाराम धोंडबा काळसर्पे हे एका अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून ते अनोळखी व्यक्तीसोबत दिसून येत होते. त्याच अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणावरून पांढऱ्या रंगाच्या लाल झरी असलेल्या कापडी दुपट्टयाने त्यांची गळा घट्ट आवळुन हत्या केली असावी, असा संशय मृतकांचा मुलाने व्यक्त केला आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी उमरेड येथे आरोपीविरुध्द कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
४५ हत्येच्या घटनांची नोंद: 2022 च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, हत्येच्या घटनांमध्ये उपराजधानी नागपूर शहर अव्वल स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात ही बाब नागपूर शहर पोलिसांसाठी भूषणावह नाही. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हत्येच्या घटनांची संख्या घटली आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. १ जानेवारी ते ३० ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण ४५ हत्येच्या घटना घडल्या आहेत. दर महिन्यात सरासरी पाच ते सहा हत्येच्या घटना घडल्या आहेत.