ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांच्या विशेष मोहिमेत अडीच कोटींचे ड्रग्स जप्त; 21 अटकेत


मुंबई: अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने मुंबईत राबवलेल्या विशेष मोहिम अंतर्गत केलेल्या कारवाईत आतापर्यंत अडीच कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी 15 गुन्ह्यांमध्ये 21 जणांना अटक करण्यात आली आहे.याशिवाय अमली पदार्थ विरोधी पथकाने मागील 12 तासात केलेल्या 3 कारवायांमध्ये 25 लाख रुपयांचे मेफेड्रॉन एमडी जप्त करण्यात आले आहे. याशिवाय ई-सिगारेटच्या गोदामावर कारवाई करण्यात आली असून त्यात ई-सिगरेटचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ट्रॉम्बेमध्ये कारवाई

ट्रॉम्बे चिताकॅम्प परिसरात ई-सिगारेटचे गोदाम असून तेथे ई सिगारेटची विक्री, लिक्वीड फ्लेवर्सचा वापर करून ई सिगारेट पुन्हा रिफील करण्यात येतात. तसेच त्यांची बॅटरी पुन्हा रिअसेंबल करण्यात येत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षाला मिळाली होती.

या गोदामावर छापा टाकून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या गोदामातून 301 ई – सिगारेट, वापरून रिकाम्या झालेल्या 402 ई – सिगारेट, 130 ई – सिगारेटच्या बॅटऱ्या व फिल्टर्स, 303 ई सिगारेट फ्लेवर्स बाटल्या, ई – सिगारेटच्या बॅटरीचे 9 चार्जर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एकूण पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दहिसर कांदरपाड्यात कारवाई

दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा परिसरात करण्यात आलेल्या अन्य कारवाईमध्ये दोघांना अटक करण्यात आली. आरोपीकडून 77 ग्रॅम वजनाचे ‘एम. डी’ (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 15 लाख 40 हजार रुपये आहे. याप्रकरणी कांदिवली कक्षात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत वरळी कक्षाने माझगाव येथून एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून 46 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 10 लाख रुपये आहे.

कारवाईत अडीच कोटींचा ऐवज जप्त

मागील 15 दिवसांत अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने विशेष मोहिमेदरम्यान यशस्वीरित्या एकूण 14 गुन्हे नोंद केले असून एकूण 21 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 849 ग्रॅम एम. डी., 1 किलो 230 ग्रॅम चरस, 92.4 ग्रॅम हेरॉईन, 280 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा सुमारे 2 कोटी 60 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button