केजरीवाल यांचा ४५ कोटी रुपयांचा महाल!
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे महाराजाप्रमाणे राहत असून त्यांनी ४५ कोटी रुपयांचा महाल उभारला आहे. या महालात १ कोटी रुपयांची मार्बल तर ८ लाख रुपयांचे पडदे आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबीत पात्रा यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत केला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणावरून भाजपने त्यांच्यावर टिका केली आहे. भाजप प्रवक्ते डॉ. संबीत पात्रा म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नुतनीकरणाविषयी प्रसारमाध्यमांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामध्ये केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी ४५ कोटी रूपयांचा खर्चल केल्याचे समोर आले आहे. केजरीवाल यांच्या घरात ८ लाख रुपयांचे पडदे लावण्यात आले आहेत, तर १ कोटी १५ लाख रुपयांची मार्बल व्हिएतनामवरून मागविण्यात आली आहे, असा दावा डॉ. पात्रा यांनी केला आहे.
भाजपच्या आरोपांना आपतर्फे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी 15 कोटी रुपये, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या विमानखरेदीवर 191 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मध्य प्रदेशातील शिवराज सिंह यांनी विमान खरेदीसाठी 65 कोटी रुपये खर्च केले. त्याचप्रमाणे देशाच्या पंतप्रधानांच्या नव्या घरासाठीदेखील ५०० कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे आपवर बिनबुडाचे आरोप करण्यात येत असल्याचाही दावा संजय सिंह यांनी केला आहे.
असा केला केजरीवाल यांनी खर्च
इंटिरिअर डेकोरेशनसाठी 11.30 कोटी रुपये, स्टोन आणि मार्बल फ्लोअरिंगसाठी 6.02 कोटी रुपये, इंटीरियर कन्सल्टन्सीवर 1 कोटी रुपये, इलेक्ट्रिकल फिटिंग्ज आणि उपकरणांवर 2.58 कोटी रुपये, फायर फायटिंग सिस्टीमवर 2.85 कोटी रुपये, वॉर्डरोब्स आणि 1.41 कोटी रुपये खर्चाचा समावेश आहे. अॅक्सेसरीज फिटिंग्ज आणि किचन अप्लायन्सेससाठी 1.1 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.