महाराष्ट्रातील ४० भाजप नेते कर्नाटकात
मुंबई : ”गेल्या निवडणुकीत स्पष्ट जनादेश न दिल्याने कर्नाटकमध्ये झालेली काँग्रेस-जेडीयू सरकारची सर्कस तुम्ही अनुभवली आहे. जनतेच्या आशिर्वादाने आता बसवराज बोम्मई सरकार सत्तेवर असून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार व राज्य सरकार डबल इंजिन असल्याने कर्नाटक वेगाने विकासाच्या वाटेवर आहे.
या निवडणुकीतही भाजपला स्पष्ट बहुमत देवून डबल इंजिन सरकार सत्तेवर आणावे”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विजयपुरा (कर्नाटक) येथील प्रचारसभेत केले.
इंडी मतदारसंघातील कासूगौडा बिरादर यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी या मतदारसंघात दौरा करुन काही सभाही घेतल्या. केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह राज्यातील ४० भाजप नेते आमदार-खासदार कर्नाटक निवडणुकीची कामे व प्रचार दौऱ्यात सहभागी झाले आहेत.