बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त; शिवराज नायकवडी यांनी स्वीकारला प्रशासक पदाचा कारभार
कोल्हापूर:गैरकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरुन वादग्रस्त बनलेले बाळूमामा देवस्थान ट्रस्ट अखेर बरखास्त करण्यात आले आहे. शिवराज नायकवडी यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंदिर कामकाज पाहण्यास मंगळवारी सुरुवात केली.
त्यांनी एम. के. नाईक व सत्यनारायण शेनॉय या धर्मादाय निरीक्षकां समवेत कामकाजाला सुरुवात केली.
आमदापूर येथील बाळूमामा मंदिरचे व्यवस्थापन पाहण्यासाठी बाळूमामा देवस्थान ट्रस्ट कार्यरत आहे. देवस्थान ट्रस्टच्या दोन गटात अधिकृत कोण यावरून वाद सुरु होता. ट्रस्टी नेमणूक आणि मंदिरामध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही दाखल केली आहे. या संदर्भात ते वकिलांना भेटायला आले असता त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, साथीदारांनी त्यांच्यावर येथे भर रस्त्यात हल्ला केला होता.
भाविकांनी हा वाद मिटून कारभार योग्य पद्धतीने सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. तोडगा म्हणून तहसीलदारानी शांतता समितीची बैठक बोलावली होती. तिथेही हा वादधुमसत राहिला. अखेर बाळूमामा देवस्थान समितीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. शिवराज नायकवडी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये केलेल्या प्रयोगशील, भाविकानुल कारभार चर्चेत असल्याने येथेही त्याचा प्रत्यय येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर तिघा प्रशासकानी पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात केली.