क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

पुणे : मद्यधुंद महिलेचा हॉटेलमध्ये गोंधळ ; महिला पोलिसालाही मारहाण


पुणे : मार्केटयार्ड पोलिस ठाण्याला लागूूनच असलेल्या हॉटेलमध्ये जेवणात भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद अवस्थेतील एका महिलेने गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या महिला पोलिस कर्मचार्‍याला तिने मारहाण केल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली.

सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच हॉटेलमध्ये गोंधळ घातल्या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली. याप्रकरणी नूतन सुभाष सुर्वे (45, रा. केदारीनगर, वानवडी) हिला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस नाईक वनिता माने यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वनिता माने या मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या वाहनतळाजवळ श्रीसागर हॉटेल आहे. हॉटेलच्या मागील बाजूस मार्केट यार्ड पोलिस ठाणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतन सुर्वे ही श्रीसागर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. तिने मद्यपान केले होते. जेवणात भाकरी न दिल्याने सुर्वे संतापली. तिने हॉटेलमधील कामगार आणि व्यवस्थापकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी हॉटेलमध्ये जेवण करणार्‍या ग्राहकांच्या ताटात पाणी ओतले तसेच ग्राहकांना तिने शिवीगाळ केली.

व्यवस्थापकाने त्वरित या घटनेची माहिती मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात दिली. पोलिस कर्मचारी वनिता माने हॉटेलमध्ये पोहोचल्या. त्या वेळी मद्यधुंद अवस्थेतील सुर्वेने गणवेशात असलेल्या माने यांच्या नावाची पट्टी खेचली. माने यांना धक्काबुक्की करून त्यांचा अंगठा पिरगळला. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी सुर्वेला अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button