अनैतिक संबंधातून बेकायदा गर्भपात?
कोल्हापूर: छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय परिसरात मृत अवस्थेत आढळून आलेल्या अर्भकप्रकरणी पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाने चौकशीची व्याप्ती वाढविली आहे.
अनैतिक संबंधातून वाढलेला गर्भ नष्ट करण्यासाठी बेकायदा गर्भपात करण्यात आला असावा, असा तपासाधिकार्यांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. मात्र, हा गर्भपात कोणी आणि कुठे केला, याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.
अर्भकप्रकरणी तपास यंत्रणांकडून वेगवेगळ्या स्तरावर चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. गर्भलिंगसह बेकायदा गर्भपातप्रकरणी शहर व जिल्ह्यातील सराईत रॅकेट कार्यरत असावे का, याचाही शोध घेण्यात येत आहे. घटनेचा लवकरच पर्दाफाश शक्य असल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी दोन व्यक्तींकडे चौकशी केल्याचे समजते. अर्भक प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे.
प्लास्टिक पिशवीतून कचरा कोंडाळ्यात टाकलेल्या चार आणि सहा महिन्यांच्या दोन मृत अर्भकांना शासकीय रुग्णालय आवारात आणून मोकाट कुत्र्यांनी त्याचे अक्षरश: लचके तोडल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी चव्हाट्यावर आला होता. पोलिस यंत्रणेसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने घटनेची दखल घेत तातडीने चौकशी सुरू केली आहे.
वेगवेगळ्या स्तरावर पोलिसांची चौकशी
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अंजना फाळके, उपनिरीक्षक इकबाल महात, हवालदार संजय कोळींसह मुन्ना कुडचे, मुरलीधर रेडेकर यांची विशेष पथके वेगवेगळ्या स्तरावर कार्यरत झाली आहेत. तपास अधिकार्यांनी शासकीय रुग्णालयातील प्रसूतीगृहासह शहरातील काही खासगी रुग्णालयांत स्वत: जाऊन तीन-चार दिवसांच्या काळात प्रसूती झालेल्या महिलांसह अर्भकांची माहिती घेतली. प्रसूतीनंतर डिस्चार्ज झालेल्या महिला व घरातील प्रमुख मंडळींशीही त्यांनी संपर्क साधला. मात्र, काहीही ठोस माहिती हाती लागली नसल्याचे सांगण्यात आले. अनैतिक संबंधातून बेकायदा गर्भपातातून हा प्रकार घडला असावा, असा तपासाधिकार्यांचा संशय असल्याने चौकशीतून निष्पन्न होणार्या माहितीकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
आज उत्तरीय तपासणी
लचके तोडलेल्या अवस्थेतील दोन्हीही मृत अर्भकांची शनिवारी उत्तरीय तपासणी होईल. तसेच ‘डीएनए’ तपासणीसाठी अवयवांचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत. उत्तरीय तपासणीत अर्भकांचे लिंग आणि त्यांचे वय निष्पन्न होईल, असे उपनिरीक्षक महात यांनी सांगितले.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.