नाशिकमध्ये विहीर खोदताना भीषण स्फोटात 3 ठार
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील हरसूलमधील हिरडी गावात विहीर खोदताना झालेल्या जिलेटीनच्या भीषण स्फोटात तीन मजुरांचा जागीचा मृत्यू झाला आहे. लहू जालिंदर महाजन, आबा उर्फ पिनू एकनाथ बोराडे, बिविषण शामराव जगताप अशी मृत मजुरांची नावे आहेत.
नाशिकच्या हरसूलमधील हिरडी गावात ग्रामपंचायतची विहीर खोदताना हा अपघात झाला आहे. जिलेटीनच्या भीषण स्फोटात तीन मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत हद्दीतील शेल्याची विहीर असून विहिर खोल करण्याचे काम सुरु होते. यासाठी बार लावण्यात येऊन स्फोट घडविले जात होते. मात्र काल रात्रीच्या सुमारास बार लावत असताना अचानक लावलेल्या बारचा स्फोट झाला आणि यात तिन्ही कामगारांचा मृत्यू झाला आहे. यात दोघे कामगार स्फोटाने बाहेर फेकले गेले तर एक कामगार विहिरीत पडून मृत्यूमुखी पडला आहे.
घटना घडल्यानंतर तात्काळ हरसूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत कामगारांना तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. तर सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून प्राथमिक तपास करण्याचे काम सुरु आहे.