ताज्या बातम्यामहाराष्ट्र

११ वेळा अपयश पदरी.. पण खाकी वर्दी चढवूनच घरी..!


गडचिरोली : यश मिळविण्यासाठी कितीदा प्रयत्न करावे, हे झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना अनेकदा जमिनीवर कोसळणाऱ्या मुंगीपासून शिकण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात.
तर आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर मोटिव्हेशन स्पिच देणारे जगातील अनेक महान व्यक्तींची उदाहरणे देतात. ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी कितीवेळा अपयशी ठरले, हे सांगण्यास विसरत नाही. यापेक्षाही कदाचित सरस ठरेल अशी कहाणी गडचिरोली शहरातील इंदिरानगरातील गोविंदसिंग प्रीतमसिंग चव्हाण या पोलिस भरतीत वाहनचालक पदावर नियुक्त झालेल्या एसआरपीएफ, आर्मी, पोलिसच्या ११ भरत्या त्याने दिल्या. बाराव्या प्रयत्नात त्याला यश मिळाले आहे. त्याचा हा प्रवास थक्कच करणारा आहे.गोविंदसिंगचे वडील प्रीतमसिंग हे २०१४ मध्ये मरण पावले. ते एका हॉटेलमध्ये आचारी होते. वडिलांच्या मृत्यूनंतर उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने संसाराचा गाडा चालविणे कठीण होऊ लागले. त्यावेळी २१ वर्ष वय असलेल्या गोविंदसिंगसमोर मजुरी केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. शहरातील एका ठेकेदाराकडे तो नळ फिटिंगच्या कामावर जाऊ लागला.

सोबतच तो पोलिस भरती, सीआरपीएफ भरती, एसआरपीएफ भरती व आर्मीच्या भरती देत होता. काही भरत्यांमध्ये तो शारीरिक चाचणी पार करून लेखीपर्यंत पोहोचत होता. डे मात्र, दोन ते तीन गुणांनी त्याची नोकरी हिरावली जात होती. निवड यादी बघितल्यानंतर त्याच्या पदरी निराशाच येत होती. मात्र, प्रयत्न सोडायचे नाही, हे त्याने ठरविले होते. या भरतीत त्याने जीवतोड मेहनत केली. मेहनत फळाला आली व गोविंदसिंगची पोलिस भरतीत निवड झाली.

गोविंदसिंगच्या आजपर्यंतच्या लढ्यात त्याची आई खंबीरपणे त्याच्या पाठीशी होती. त्यामुळे गोविंदसिंगने आपल्या यशाचे खरे श्रेय आईलाच दिले आहे. आपला मुलगा पोलिस दलात नोकरीला लागला ही माहिती कळताच तिच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहण्यास सुरुवात झाली. गोविंदसिंगने संघर्ष करत नोकरी मिळविल्याने त्याचे नातेवाईक, मित्रपरिवार व वॉर्डातील नागरिक कौतुक करत आहेत.

युवकांसाठी प्रेरणादायी प्रवास वयाची तिशी गाठली आहे. वयाच्या मर्यादेमुळे पुढील पोलिस भरती देण्याची संधी मिळणार की नाही, अशी शंका असल्याने या भरतीसाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करण्याचे ठरवले होते. सकाळी शारीरिक चाचणीचा सराव, दुपारी मजुरी व सायंकाळी अभ्यास असे नियोजन होते. दोन वर्षांपूर्वी त्याने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या पोलिस भरतीत त्याने वाहन चालक पदासाठी अर्ज केला. यात त्याला चांगले गुण मिळाले व त्याची निवड झाली. विपरित स्थितीतही गोविंदसिंगने नोकरीसाठी दिलेला लढा जिल्ह्यातील इतर युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button