राजकीय घडामोडींवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे सर्वात जास्त चर्चेत आहेत.
अजित पवार भाजप सोबत जाणार किंवा अजित पवार नॉट रिचेबल अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत आहेत. या सर्व बातम्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले या सर्व फक्त तुमच्या मनातील चर्चा आहेत. अजित पवार यांच्याविषयीच्या सर्व बातम्या खोट्या आहेत, असे शरद पवार म्हणाले
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर ते अचानक नॉट रिचेबल झाले. त्यांच्या सोबत आणखी 7 आमदार देखील नॉट रिचेबल होते. तेव्हापासून अजित पवार यांच्या हालचालींविषयी दरवेळी नवीन वृत्त येत आहे. अजित पवार भाजप सोबत जाण्याची तयारी करत आहेत, अशी चर्चा वारंवार राजकीय वर्तुळात केली जात आहे.
या चर्चा रंगताना अजित पवार हे एका ज्वेलर्सच्या शो रुमच्या उद्घाटनाला सपत्निक हजर होते. त्यावेळी त्यांनी तब्ब्येत ठीक नसल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. मी नॉट रिचेबल नव्हतो. असा खुलासा केला होता. त्यामुळे अजित पवार यांनी खुलासा केल्यानंतर चर्चा काही काळ थांबल्या होत्या.
मात्र, त्यानंतर पुन्हा अजित पवार यांच्या हालचालींवरून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहे. अजित पवार भाजपसोबत युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची जागा घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी सुमारे ४० आमदारांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या आमदारांनी अजित पवार यांना त्यांची संमती असल्याच्या सह्या दिल्या आहेत. योग्य वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, असे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेसने राष्ट्रवादी पक्षातील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
राष्ट्रवादी फोडण्याचे प्रयत्न सुरू – संजय राऊत
या सर्व चर्चांचे उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी खंडन केले. अजित पवार महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याविषयी सुरू असलेल्या सर्व चर्चा फक्त अफवा आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट टाकण्याचे प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
Maharashtra Politics : अखेर शरद पवारांनी मौन सोडले
अखेर शरद पवार यांनी या सर्व चर्चा आणि तर्क वितर्कांवर मौन सोडले आहे. अजित पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्यांनी अजित पवार हे पक्षाचे काम करत असून अजित पवार यांनी कुठलीही बैठक बोलावली नाही. त्यांच्यासोबत सर्वच सहकारी पक्ष मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. बाकी सर्व तुमच्या केवळ तुमच्या मनातील चर्चा असून अजित पवार यांच्याविषयी सर्व बातम्या खोट्या आहेत.