निवृत्त फौजीचं पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण; मुंबईत भरतीदरम्यान मृत्यू
मुंबई:लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोलीस भरती होण्याचे स्वप्न बाळगले. त्यानुसार तयारीही सुरू केली. मुंबई पोलीस बनण्यासाठी ते मैदानी परीक्षा देत होते.
त्यावेळी धावताना अचानक मैदानावर कोसळले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सचिन कदम यांच्याबाबत ही दुर्दैवी घटना घडली. सीमेवरील देशसेवानंतर पोलीस होऊन जनतेची सेवा करण्यासाठी पोलीस भरतीच्या मैदानात उतरलेल्या सचिन यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सचिन कदम हे मूळचे खेड (Khed) तालुक्यातील दहिवली येथील रहिवासी आहेत. ते लष्करातून (Army) निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस होण्यासाठी तयारी सुरू केली. पोलीस बनण्यासाठी ते काही दिवसांपासून कल्याण येथे राहण्यास आले होते.
या प्रकरणी अधिक माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) सध्या पोलीस भरतीसाठी कालिना ग्राऊंडवर मैदानी परीक्षा सुरू आहे. पोलीस भरतीसाठी रविवारी (ता. १७) कालिना मैदानात ते शारीरिक परीक्षेसाठी आले होते. त्यानुसार १६०० मीटर धावताना ते तिसऱ्या राऊंडला कोसळले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर त्यांना तत्काळ वी.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांना भर उन्हात धावताना भोवळ येण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही १७ फेब्रुवारी रोजी वाशीमहून (Washim) पोलीस भरतीसाठी आलेल्या गणेश उगले या तरुणाचा कालीना येथील मैदानात धावताना कोसळून मृत्यू झाला होता. तसेच अमर सोलंकी या अमरावतीच्या (Amaravati) तरुणाचाही याच मैदानात २२ फेब्रुवारी रोजी मृत्यू झालेला आहे.