ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बळीराजावर अवकाळी संकट; गारपिटीने हिरावला घास, हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट


छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांना शुक्रवारीही अवकाळीचा तडाखा बसला. यात काढणीला आलेली पिके मातीमोल झाली. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला.
या पावसाने २१ जनावरांचाही जीव घेतला आहे. हिंगोलीत वीज कोसळून एकाचा, तर परभणीत तिघांचा असे चारजण दगावले तर २२ नागरिक जखमी झाले आहेत. अवकाळीच्या नेमक्या संकटात सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडल्याचे चित्र आहे.

अमरावती जिल्ह्यात गुरुवारी पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला, शुक्रवारी धारणी तालुक्यात गारपिटीची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. परभणीत ३० हजार हेक्टरवरील गहू, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच लातूर जिल्ह्यातही माेठे नुकसान झाले आहे.

आणखी दोन दिवस प्रकोप; काही ठिकाणी यलो अलर्ट

सध्या देशाच्या ८० टक्के भागात अवकाळी पावसाची स्थिती तयार झाली असून, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस कायम राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मराठवाड्यात शनिवारी गारपिटीचा अंदाज आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत हवामानाची ही स्थिती कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली असून, येलो अलर्ट दिला आहे.

संपाचा पंचनाम्यांवर परिणाम

– मराठवाड्यातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपावर आहेत. विभागातील ४५० मंडळांतील तलाठी, मंडळ अधिकारी रजेवर असल्यामुळे प्राथमिक नुकसानीचा अहवाल ई – पाहणीच्या आधारे केला आहे.

– १४ मार्चपासून महसूल कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे पंचनामे कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विभागातील सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार, एसडीएमच्या पथकांसह बांधावर पोहोचले व त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button