जिल्ह्यातील ४९६ शाळांमध्ये स्लॅस चाचणी
छत्रपती संभाजीनगर : (आशोक कुंभार ) राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण चाचणी (स्लॅस) परीक्षा १७ मार्चला जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील ४९६ शाळांमध्ये होणार आहे. या निवडलेल्या शाळांमध्ये प्रत्येक ३० विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी दिली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दर तीन वर्षांतून एकदा राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी म्हणजेच ‘नॅस’ परीक्षेचे आयोजन केले जाते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) यांच्या वतीने राज्यभरातील शाळांमध्ये राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीतील मुलांची घेतली जाणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील ४९६ शाळांची निवड राज्य स्तरावरूनच यादृच्छिकपणे करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील इयत्ता तिसरी व पाचवी प्रत्येकी १५२; तर आठवीचे १९२ अशा एकूण ४९६ शाळेतील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचणीद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शनांतर्गत तालुका समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडलेल्या शाळांमध्ये प्रत्येक तीस विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. हे सर्वेक्षण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये होणार असून, प्रथम भाषा मराठी व गणित या दोन विषयामधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असणार आहे.
स्लॅस सर्वेक्षणासाठी तालुकानिहाय शाळा
छत्रपती संभाजीनगर ः ५२
गंगापूर ः ५९
कन्नड ः ६८
खुलताबाद ः २३
पैठण ः ६७
सिल्लोड ः ६२
सोयगाव ः १५
वैजापूर ः ५८
फुलंब्री ः २६
यूआरसी १ ः २९
यूआरसी २ ः ३७
एकूण ः ४९६