दुप्पट पैशाच्या आमिषाने महिला भाळली 35 लाख रुपयांची फसवणूक..
दौंड : ( आशोक कुंभार ) महिलेची पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून तब्बल 34 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँक खात्यामधून 15 लाख 48 हजार रुपये आणि त्यानंतर तब्बल 39 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेत ही फसवणूक करण्यात आली.
दौंड पोलिस ठाण्यात मोजेस दीपक उजागरे (रा. गजानन सोसायटी, दौंड) या तरुणाविरुद्ध सुधा गौरव साळवे (रा. दौंड) या महिलेने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
सुधा साळवे यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर आयुर्विम्याची रक्कम मिळाल्याची माहिती मोजेस उजागरे याला होती व त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून त्याने विश्वास संपादन केला. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत त्याने 15 लाख 48 हजार रुपये रोख व ऑनलाइन पध्दतीने स्वीकारले. त्यापैकी फक्त 10 हजार रुपये सुधा साळवे यांच्या बँक खात्यात जमा केले.
दरम्यान, मूळ रक्कम व ठरल्याप्रमाणे दुप्पट रकमेची मागणी सुधा साळवे यांनी मोजेस याच्याकडे करताच त्याने खोटी कारणे सांगून आधी गुंतविलेले पैसे मिळविण्यासाठी आणखी रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. ही रक्कम जर दिली नाही तर आधीचे 15 लाख 48 हजार रुपये बुडणार असल्याचे सांगत त्याने आणखी रकमेची मागणी केली.
सुधा साळवे यांनी सर्व रक्कम संपल्याचे सांगताच मोजेस याने अंगावरील आणि घरातील सोने दिल्यास ते गहाण ठेवून रक्कम मिळेल, असे सुचविले. भीती आणि दुप्पट पैशांच्या आमिषापोटी सुधा साळवे यांनी त्यांच्या घरातील 39 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मोजेस याला दिले. मोजेस उजागरे याच्याकडे सुधा साळवे यांनी सोने सोडवून आणण्याबरोबर पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु,
त्याने बदनामीची धमकी देत नकार दिल्यानंतर सुधा साळवे यांनी दौंड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.