“राज्याच्या गृह मंत्रालयाची कामगिरी सुमार आहे, अघोरी कृत्य, यासंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे -खासदार सुळे
पुणे : ( आशोक कुंभार ) बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे महापालिकेचा भाग समाविष्ट आहे. तेथील नागरी समस्यांच्या संदर्भात खासदार सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, “राज्य सरकारने अर्थसंकल्पात खूप योजनांची घोषणा केली आहे पण राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहता या घोषणा प्रत्यक्षात येणार आहेत का ? ” असा सवाल उपस्थित केला.
“महिलांसाठीच्या योजना स्वागतार्ह आहे, बस प्रवासात पन्नास टक्के सवलतीचेही स्वागत आहे, पण एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर मिळतो का ?, एसटीची स्थिती चांगली आहे का हे पाहणेही महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना खत खरेदी करताना जात विचारली जात आहे, देशात असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही. केंद्र सरकारचा हा निर्णय जातीयवाद वाढविणारा आहे, याविरोधात संसदेतही मुद्दा उपस्थित करणार आहे,” असे सुळे यांनी सांगितले.
“राज्याच्या गृह मंत्रालयाची कामगिरी सुमार आहे, अघोरी कृत्य, यासंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. जे विरोधक भाजपच्या प्रलोभनांना बळी पडत नाही, त्यांच्यावर इडी, सीबीआयची कारवाई लावली जाते,” अशी टीकाही सुळे यांनी केली.
महापालिकेने कर्ज काढू नये :
वारजे येथे महापालिका ३५० बेडचे रुग्णालय उभारणार आहे, त्यासाठी महापालिका संबंधित ठेकेदारास ३६० कोटी रुपयांचे कर्ज काढून देणार आहे. यासंदर्भात सुळे म्हणाल्या, ”महापालिका संबंधित ठेकेदाराला आपली जागा उपलब्ध करून देत आहे. अशा परिस्थितीत ठेकेदारानेच त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारून ते चालवणे अपेक्षित आहे. महापालिकेने कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या नावे कर्ज काढणे हे चुकीचे आहे. याला आमचा विरोध राहील.”